पुतण्याचे नाव पुढे करीत प्रकाश सोळंकेंनी स्वतःसाठीच केला प्रचार; पुतण्याच्या कार्यकर्त्यांत धुसफूस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 11:47 AM2024-11-04T11:47:29+5:302024-11-04T11:48:33+5:30
जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता.
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव ( बीड) : दोन महिन्यांपूर्वी राजकीय निवृत्ती जाहीर करून वारसदार म्हणून पुतण्याचे नाव पुढे केले. उमेदवारीसाठीही पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला. इकडे पुतण्या जयसिंह साेळंके मात्र, मलाच उमेदवारी मिळेल, या आविर्भावात राहिले. ऐनवेळी अजित पवार गटाने विरोधी उमेदवार बदलल्याचे कारण देत पुन्हा एकदा प्रकाश सोळंके यांनाच उमेदवारी दिली. परंतु, हे पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही. त्यामुळेच आजही त्यांच्यात धुसफूस सुरूच असून, उमेदवारी बदलण्याची मागणी करीत आहेत. प्रकाश सोळंके यांनी मात्र, पुतण्याला अंधारात ठेवून स्वत:साठीच प्रचार केला होता, अशी चर्चा मतदारसंघात आहे. आता पुतण्याचे कार्यकर्ते पुढील निर्णय काय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत सहानुभूती मिळवीत विजय मिळविला होता. मागील पाच वर्षांत मतदारांमध्ये असलेली नाराजी पाहता प्रकाश सोळंके यांनी दोन महिन्यांपूर्वी त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांना वारस म्हणून पुढे करीत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे जयसिंह सोळंके यांनी मतदारसंघातील गाव न गाव, वस्ती, वाड्या, तांडे, आदी ठिकाणी जाऊन एक प्रचार दौरा पूर्ण केला होता. एकीकडे पुतण्या फिरत असताना दुसरीकडे आ. प्रकाश सोळंके हे एक दिवसही घरी न बसता मतदारसंघातील कायम गावोगावी प्रचार दौरा करताना दिसत होते. मागील एक वर्षात त्यांचा मतदारसंघात दोन-तीन वेळा प्रचार दौरा केला होता. प्रकाश सोळंके हे मतदारसंघात ज्या पद्धतीने फिरत होते त्यावरून राजकीय विश्लेषकांमध्ये वारंवार विषय चर्चिला जायचा तो म्हणजे प्रकाश सोळंके हे पुतण्याला पुढे करीत असून, ते पुतण्याला कधीही तिकीट मिळू देणार नाही. ते जे प्रचार करीत आहेत ते पुतण्यासाठी न करता स्वतःसाठीच करत असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांचे हे मत खरे ठरले, असेच म्हणावे लागेल.
पुतण्याच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या घरासमोर ठिय्या
जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवार पर्यंत जाऊन जयसिंह सोळंके यांना तिकीट देण्याची मागणी केली होती. घरासमोर ठिय्यादेखील मांडला होता. परंतु, अजित पवार यांनी मी कोरा बी फॉर्म दिला असून, त्यांनी कोणाचे नाव लिहावे हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत कार्यकर्त्यांना परत पाठविले होते. जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते खूपच नाराज असल्याचे दिसून येऊ लागले असून, ते वेगळा निर्णय घेण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत.
तर काका-पुतण्यात लढत ?
लोकसभा निवडणूक संपताच जयसिंह सोळंके हे दोन वेळा जयंत पाटील व शरद पवार यांची भेट घेऊन आल्याची माहिती प्रकाश सोळंके यांना मिळाली होती. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी शरद पवार हे पुतण्याला तिकीट देऊन माझ्या विरोधात लढवू शकत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जयसिंह सोळंके यांना वारस म्हणून जाहीर केले होते. परंतु पुतण्या प्रामाणिक राहिला. ऐनवळी त्यांनी माघार घेतली. जर जयसिंह यांना उमेदवारी मिळाली असती तर यावेळी काका-पुतण्यात लढत झाली असती.