प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने परळीकरांचा अपेक्षाभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:22 AM2021-07-09T04:22:31+5:302021-07-09T04:22:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परळी : केंद्रीय मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : केंद्रीय मंत्रिमंडळात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंडे यांना मंत्री नाही केले तर काय झाले. ताई साहेब, आमच्या मनात आताही मंत्री आहेत. पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज नाही राहिली. आता तरी ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा, असा संदेश सोशल मीडियातून कार्यकर्त्यांनी गुरुवारी पसरविला.
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी वाड्यावस्त्यांवर, तांड्यावर भाजप पक्ष पोहोचविला आहे. इतके सर्व पक्षात करूनही त्यांच्या पश्चात हे घडत असेल तर आम्ही काय प्रेरणा घ्यावी. या पक्षाकडून पक्षवाढीसाठी मेहनत घ्यावी की वरचेवर काम करावे. ४० विधानसभा मतदारसंघांत माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे भगिनींचा प्रभाव आहे. पक्षातील वरिष्ठांनी पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांना साथ द्यायला हवी; परंतु साथ न देता त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न चालू आहे. ताईंनी वेगळी भूमिका घ्यावी यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत, असे भाजपा कार्यकर्ता सचिन गीत्ते यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळणे हे धक्कादायक आहे. राज्यातील ओबीसी समाजासह इतरही समाजात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या जनतेतून विक्रमी मताने निवडून येणाऱ्या नेत्यास डावलल्यामुळे जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत. स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली. हाच वसा पुढे चालवत संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पंकजा व खा. प्रीतम मुंडे यांनी पक्षाला सत्तेवर बसवण्यात मोलाचा वाटा उचलला होता. मात्र, आता काही स्वकीयांच्याच कारस्थानांमुळे मुंडे भगिनींना डावलण्याचा हा प्रकार आहे. यामुळे भाजपाचेच नुकसान होणार आहे, असे अश्विन मोगरकर यांनी सांगितले.
पक्ष काय इशारा देतो हे सांगायची गरज राहिली नाही. आता तरी पंकजा यांनी योग्य निर्णय घ्यावा, अशी नवीन मराठे यांनी सोशल मीडियाद्वारे भावना व्यक्त केली.