पावसाळीपूर्व कामे सुरू केली भर पावसाळ्यात - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:34 AM2021-07-28T04:34:57+5:302021-07-28T04:34:57+5:30
बीड : राज्यातील इतर जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले असून, पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून पाटबंधारे ...
बीड : राज्यातील इतर जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले असून, पूरस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्या ठिकाणची परिस्थिती पाहून पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील विविध धरण क्षेत्रातील साफसफाईची कामे सुरू केली आहेत. पावसाळ्यापूर्वी होणारी कामे निम्मा पावसाळा झाल्यानंतर कामे सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, अनियमिततेबद्दल संंबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे.
जिल्ह्यात अनेक धरणांच्या भिंतीवर तसेच लाभक्षेत्रात असेल्या झाडांची कापणी, त्या ठिकाणची साफसफाई व डागडुजी करण्याची कामे पावसळ्यापूर्वी होणे गरजेचे असतात. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्ह्यातील धरणांवरील साफसफाईची कामे भर पावसाळ्यात करण्यात येत आहेत. असाच प्रकार पाली येथील बिंदुसरा धरण क्षेत्रात समोर आला आहे. धरणाच्या भिंतीच्या बाहेरील ३ झाडे व खजाना विहीर परिसरातील १८ झाडे तोडण्याचा लिलाव करण्यात आला होता. ही लिलावप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी झाडे तोडण्यास सुरुवात केली. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी झाडे तोडण्यास मनाई केली. दरम्यान, या पत्रात कोणत्या स्वरूपाची झाडे तोडायची याचा उल्लेख केलेला नव्हता. तसेच यासाठी वनविभाग किंवा संबंधित महसूल विभागाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही झाडे तोडणाऱ्या गुत्तेदारावर गुन्हा दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने फोन न उचलल्यामुळे प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
नागरिकांनी दाखवली सतर्कता
बिंदुसरा धरणाच्या भिंतीच्या खाली असलेल्या रस्त्याच्या बाजूची झाडे गुत्तेदाराकडून तोडण्यात आले आहेत. पत्रात यासंबंधी कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच त्या ठिकाणी कोणती झाडे तोडावयाची आहेत, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी शाखाधिकारी जलसिंचन शाखा बिंदुसरा उपस्थित नव्हता. नागरिकांच्या सतर्कतेमुळे झाडांची कत्तल रोखण्यात आली. मात्र, खजाना विहीर परिसरात झाडे तोडल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
परवानगी नसताना तोडली जातात झाडे
दिलेल्या पत्रात फक्त २१ झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, तसेच यामध्ये वाळलेली झाडे तोडणे अपेक्षित असताना चांगली व पूर्ण वाढ झालेली झाडे तोडण्याचा डाव गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आलेले आहे. त्यामुळे पर्यावरणवादी संघटनांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
260721\194326_2_bed_30_26072021_14.jpg
धरणाजवळील रस्त्याच्या बाजूचे तोडलेले झाड