सुरांच्या हिंदोळ्यांवर शब्दब्रह्माची अनुभूती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:17 PM2017-12-25T23:17:38+5:302017-12-25T23:17:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क स्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
स्वामी रामानंद तीर्थनगरी (अंबाजोगाई) : मायमराठीच्या साडेसहाशे वर्षांच्या प्रवासासाठी प्रमुख टप्प्या-टप्प्यांवरील माईल स्टोन ठरलेल्या प्रतिभावंतांच्या गेय रचनांची नितांत सुंदर मैफल अंबाजोगाई साहित्य संमेलनात रंगली. डॉ. राजेश सरकटे व त्यांच्या चमूने जणू मराठी सारस्वतांंना घातलेला हा मानाचा मुजराच होता.
विख्यात विदूषी महदंबा यांच्या कृष्णभक्तिपर काव्याने प्रवासाचा श्रीगणेशा झाला. संत नामदेव, संत जनाई यांच्या काव्यातील भक्तिरसात रसिक चिंब झाले.
ख्रिसमसने आणलेली गुलाबी थंडी शब्दांची धग आणि त्यावर चढवलेला स्वरांचा मुलामा यामुळे रसिक श्रोते उल्हासित झालेले होते. आधुनिक मराठीच्या टप्प्यावरील कवींच्या शब्दांची पूजा बांधताना डॉ. सुहासिनी इर्लेकरांच्या शब्दकळांशी सुरावटीचा मेळ बसला
डोळ्यात रंग ओले, डोळे अभंग कोठे?
मी आज गात आहे, गाणे तुझ्यासाठी
नभकाजळी तमाने येते भरून जेव्हा
होते हताश माती, जाते तुटून तेव्हा
उजळीत लोचने ये लावुनी प्रेमज्योत
या काव्यातून स्त्रीत्वाच्या सुलभ भावना उमलू लागल्या.
त्यानंतर कवी वा.रा.कांत यांची
दूर टिटवीची साद,
वाºयावरी भरे काटा
होते पोळणी मनाची,
हुरड्यास येई लाटा
तुझ्या गुंफल्या बोटांचे,
सळ उठले वाºयात
गीत माझे थरकते
ओल्या रीतीच्या ओठात
डॉ. वैशाली देशमुख यांचा कवितेला लाभलेला स्वर आडरानात टिटवीच्या कलरवाची आठव करून गेला. डॉ. शैला लोहिया यांच्या
चांदण्याचा पूर आता
लागला रे ओसरू
दूर होई साजना, वस्त्र दे मज आवरू
या शृंगार रसातील काव्याला डॉ. देशमुख तेवढ्याच नजाकतीने पेश केले. फ.मुं. शिंदे यांच्या
‘गळाली पाने उदास राने,
सुख-दु:खाचे येणे-जाणे’
या शब्दरचनेने काहीशी स्तब्धता निर्माण केली. कविवर्य ना.धों. महानोरांच्या
‘झाडं झाली हिरवीशी,
शीळ घुमते रानात
ओळ जांभळ्या मेघांची
वाहे नदीच्या पानात’
या रचनेला गंगेच्या पाण्याइतका पारदर्शी सूर गवसला होता.
मायमराठीचे चलचित्र एकामागून एक समोर येत होती. अनुराधा पाटील यांच्या,
‘भल्या पहाटे पहाटे,
पाय नदीच्या पाण्यात
उठे नदीपार नाद, दाटे उमाळा मनात’
स्त्रीच्या अंतर्मनातील हुरहूर डॉ. वैशाली देशमुख यांच्या सुरातून जशीच्या तशी साकारली. ना.गो. नांदापूरकरांची ‘माझी मराठी असे मायभाषा’ ही अजरामर कविता डॉ. राजेश सरकटे बेभान होऊन गात होते.
तोडा चिरा दुग्धधाराच येती
न हे रक्त वाहे शरीरातुनी
माझी मराठी, मराठाच मी ही असे शब्द येतीलही त्यातुनी
या ओळींना गायकाचा टिपेला पोहोचलेला सूर अवर्णनीय होता. कविवर्य बी. रघुनाथांची
चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली,
पंढरी या ओसरीची आज ओस झाली’
कवीची काहीशी उदासवाणी भावना यमन रागात डॉ. वैशाली देशमुख यांनी अधिकच खुलविली, तर त्यांचीच लावणीवजा रचना
‘कुरवाळुनी करिशी मनधरणी,
चेटक्या तुझी कळली करणी’
गायिका संगीता भावसार यांनी तेवढ्याच ठसक्यात सादर केली. कवी इंद्रजित भालेरावांची ‘माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’ रचना डॉ. सरकटे यांनी लोकसंगीताच्या बाजात प्रस्तुत केली. दासू वैद्य यांची
जगण्याचा पाया । चालण्याचे बळ।
विचाराची कळ । तुकाराम ।।
ही रचना सादर झाली.
मराठी माणसाच्या मर्मबंधाची ठेव ठरलेल्या कविता संगीतबद्ध करून डॉ. राजेश सरकटे यांनी एका अर्थाने मायमराठीचा हा ऋणनिर्देशच केला, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. हल्लीच्या आॅर्केस्ट्राच्या जमान्यात मंचावरून वाद्यांची अनुभूती तशी बंदच झाली आहे; परंतु या संचाने सतार, बासरीचा लाईव्ह वापर करून एक सुखद अनुभव दिला. सहकलावंत उमाकांत शुक्ला (सतार), प्रथमेश साळुंके (बासरी), प्रा. जगदीश व्यवहारे (तबला), अंकुश बोरडे (ढोलकी), राजेश भावसार (आॅक्टोपॅड), राजेश देहाडे (सिंथेसायझर), संकेत देहाडे (गिटार) यांनी साथसंगत केली. शब्दसुरांच्या या प्रवासाचे सारथ्य म्हणजे निवेदन ही बाजू समाधान इंगळे यांनी सांभाळली. एकूणच संगीत संयोजन विनोद सरकटे यांचे होते.
रात्रीच्या मैफलीस खुद्द संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, संयोजन समितीचे पदाधिकारी व अंबानगरीतील रसिक श्रोते, साहित्यिक केवळ उपस्थितच होते असे नाही, तर उत्स्फूर्तपणे दादही देत होते, हे विशेष!