दोघा भावांकडून सासरी येऊन बदनामी, ब्लॅकमेलिंगमुळे गर्भवती महिलेने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:32 IST2025-04-23T13:30:46+5:302025-04-23T13:32:14+5:30
सततच्या मानसिक छळामुळे आणि बदनामीच्या भीतीने महिलेने संपवले जीवन

दोघा भावांकडून सासरी येऊन बदनामी, ब्लॅकमेलिंगमुळे गर्भवती महिलेने संपवले जीवन
आष्टी : दोघा भावांकडून वारंवार होणारी छेडछाड, ब्लॅकमेलिंग आणि त्रासाला कंटाळून तीन महिन्यांच्या गर्भवतीने जीवनयात्रा संपविली. ही घटना १६ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी २० एप्रिल रोजी अंमळनेर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बीडमधील साक्षी कांबळेचे प्रकरण ताजे असतानाच आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे.
वैष्णवी महादेव मिरड (रा. मिरडवाडी, ता. आष्टी) असे मयत विवाहितेचे नाव आहे. तर काशिनाथ राऊत आणि त्याचा भाऊ आप्पा राऊत अशी आरोपींची नावे आहेत. वैष्णवी ही तीन महिन्यांची गरोदर होती. तिचे माहेर जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील असून तिचे लग्न दीड वर्षापूर्वी झाले होते. १६ एप्रिल रोजी तिने आत्महत्या केली होती. अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद झाली, परंतु नंतर पोलिसांनी आणखी तपास केला. त्यानंतर वैष्णवी यांचे वडील प्रकाश काळे यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे.
पतीला फोन अन् खोटे आरोप
काशीनाथ हा वैष्णवीला सासरी जाऊन धमकावत होता. बदनामी करण्याची भाषा केली. इतकेच नव्हे, तर तिच्या पतीला फोन करून तिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे खोटे आरोप करत तिला सोडण्याची धमकी देण्यात आली होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि बदनामीच्या भीतीने वैष्णवीने आत्महत्या केली.