पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 11:57 PM2019-10-15T23:57:25+5:302019-10-15T23:58:36+5:30
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ आॅक्टोबर रोजी येथील परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे.
बीड/परळी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १७ आॅक्टोबर रोजी येथील परळीमधील वैद्यनाथ महाविद्यालया समोरील प्रांगणात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. यावेळी राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
परळीत सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून, सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यीतल पोलीस व अर्धपोलीस दलाच्या तुकड्या परळीत रविवारपासून तळ ठोकून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागेची मंगळवारी प्रात्यक्षिक करुन तपासणी करण्यात आली.
दरम्यान, सर्वठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी विविध स्थाळांची व बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस निरिक्षक व इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तसेच विशेष पथकांकडून गोपनीय अहवालानूसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस दल व सुरक्षा यंत्रणा चोवीस तास नियोजन करत आहेत. तसेच वाहतूकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी देखील नियोजित मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान मूलभूत सर्व सुविधा सभा स्थळावर तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
या सर्व परिस्थितीवर विशेष पोलीस महानिरिक्षक रविंद्र सिंगल, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर यांच्यासह सर्व पोलीस उपअधीक्षक हे या नियोजनावर लक्ष ठेऊन आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व इतर सर्व पथकांच्या वतीने तपासणी करण्यात आली.