तयारी तिसऱ्या लाटेची; बीड, परभणीतील ३०० योद्धांना 'धडे'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:06+5:302021-09-23T04:38:06+5:30
बीड : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याच्या अनुषंगाने बीड व परभणी जिल्ह्यांतील नर्ससह वैद्यकीय अधिकारी अशा ३०० योद्धांना उपचारपद्धती, ...
बीड : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याच्या अनुषंगाने बीड व परभणी जिल्ह्यांतील नर्ससह वैद्यकीय अधिकारी अशा ३०० योद्धांना उपचारपद्धती, नियोजन व व्यवस्थापन याबाबत शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात ६ सप्टेंबरला सुरू झालेले हे प्रशिक्षण २० दिवस चालणार आहे.
आरोग्यसेवा, वैद्यकीय शिक्षण व संशोधन आणि जपायगो संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी नियोजन केले जात आहे. ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयातील परिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि विशेष तज्ज्ञांना बोलावून घेत प्रशिक्षण दिले जात आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचे नियोजन, व्हेंटिलेटर व बायपॅपचा वापर कसा करायचा, हे प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले जात आहे. तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या समस्यांवर कसे उपचार करायचे, याचीही माहिती दिली जात आहे. लसीकरण, प्रशासकीय नियोजन, माहिती संकलन, कोरोना वॉर्डात बायोमेडिकल वेस्टेजची विल्हेवाट कशी लावणे, म्युकरमायकोसिसचा सामना कसा करायचा, याबाबत स्वारातीतील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन देत आहेत. या प्रशिक्षणाचे सर्व नियोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक हुबेकर व डॉ. संतोष गुंजकर हे करत आहेत.
---
मराठवाड्यात चार ठिकाणी प्रशिक्षण
मराठवाड्यात बीडसह नांदेड, लातूर व औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयांत प्रशिक्षण दिले जात आहे. बीडला परभणी, लातूरला उस्मानाबाद, नांदेडला हिंगोली आणि औरंगाबादला जालना जिल्हा जोडण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी जवळपास ३०० योद्धांना प्रशिक्षण दिले जात असून तिसऱ्या लाटेशी लढा देण्यासाठी १२०० योद्धा सज्ज होणार आहेत.
--
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बीड व परभणी जिल्ह्यांतील नर्स, वैद्यकीय अधिकारी संवर्गातील जवळपास ३०० लोकांना स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे २० दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. ६ सप्टेंबरला सुरुवातही झाली आहे. उपचार, नियोजन, व्यवस्थापन आदी मुद्यांची माहिती दिली जात आहे.
डॉ. संतोष गुंजकर, नोडल ऑफिसर, बीड
---
वैद्यकीय अधिकारी संवर्ग - १८०
परिचारिका - १२०
220921\22_2_bed_15_22092021_14.jpeg
अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटीलेटरची माहिती देताना तज्ज्ञ दिसत आहेत.