महाशिवरात्र सोहळ्याची पूर्व तयारी सुरू, शिरूरमध्ये व्यापक बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:22 AM2021-02-19T04:22:55+5:302021-02-19T04:22:55+5:30
शिरूर कासार : धाकटी अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सिद्धेश्वर संस्थान येथे ४३ वा महाशिवरात्र सोहळा देखणा आणि वैभवसंपन्न साजरा ...
शिरूर कासार : धाकटी अलंकापुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सिद्धेश्वर संस्थान येथे ४३ वा महाशिवरात्र सोहळा देखणा आणि वैभवसंपन्न साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर गणपती व संत सावता मंदिरात प्रतिष्ठीत व्यापारी व ग्रामस्थांची व्यापक बैठक महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी घेतली. त्यात भावनेसोबत कोरोनाचे भान सांभाळण्याचे आवाहन केले.
वै. ब्रम्हलीन संत आबादेव महाराज यांनी प्रारंभ केलेला हा सोहळा यावर्षी ४३ वे वर्ष पूर्ण करीत आहे. अव्याहतपणे सुरू असलेल्या या कार्यक्रमाचे नियोजन सालाबादप्रमाणे केले जात आहे. शिवाय स्वामी विवेकानंद शास्त्री यांना महंत पदावर बसून बारा वर्षे पूर्ण होत असल्याने त्यांचा तपपूर्ती सोहळादेखील होणार असल्याने हा सोहळा परिपूर्ण साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे.
परंपरेनुसार गणपती, कालिकामाता, हनुमान मंदिर व संत सावता महाराज मंदिरात ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. गेली ४२ वर्षे अखंडितपणे अन्नदान करणाऱ्या सेवाधारी तसेच पंचक्रोशीतील गावांबरोबर महाप्रसादाचे मानकरी यांनाही पूर्वसूचना देण्यात आल्या आहेत.
या सोहळ्याला अव्याहतपणे पंचक्रोशीतील जवळपास १८ ते २० गावांचे सहकार्य लाभत आहे. याहीवर्षी त्यांना निमंत्रण देण्यासाठी विवेकानंद शास्त्री हे रोज एका गावाला भेट देणार आहेत. तालुक्यातील आनंदगावपासून गुरुवारी निमंत्रण भिक्षा भेटीला सुरुवात झाली. पुढे कान्होबाची वाडी, कोळवाडी, झापेवाडी, दहिवंडी, भालगांव, भगवाननगर, एकनाथवाडी, तागडगांव, पाडळी, बावी, नागरेवाडी, चुंभळी, वारणी, लोणी, ढोकवड, उत्तमनगर, जांब आदी गावांत निमंत्रण देण्यासाठी महंत जाणार आहेत.
हा उत्सव धार्मिक असला तरी या माध्यमातून नैराश्य दूर करण्यासाठी नवचैतन्य निर्माण करून जगण्याचा आनंद देण्यासाठी, वैफल्य दूर करण्यासाठी हे माध्यम असते. या सोहळ्यात महिला, पुरूष आबाल वृद्धांना सामूहिक आनंद मिळण्यासाठी सर्वांनी सहकार्य भाव ठेवावा. त्याचबरोबर कोरोनाचा विसर पडू न देता नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे.