परळीत महाशिवरात्रीची पूर्वतयारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:06+5:302021-02-20T05:35:06+5:30
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत ११ मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पूर्वतयारीची बैठक ...
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत ११ मार्च रोजी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्याच्या पूर्वतयारीची बैठक गुरुवारी येथील वैद्यनाथ मंदिरात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. प्रभू वैद्य नाथाच्या दर्शनासाठी दर महाशिवरात्रीला महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक येथून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यावर्षी महाशिवरात्रीच्या आनुषंगाने या सर्व भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे या दृष्टीने श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तसेच शासकीय विविध खात्यांकडून आवश्यक ती तयारी करण्यात येत आहेत. पोलीस प्रशासन,आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, नगर परिषद या सर्व विभागांच्या वतीने महाशिवरात्रीत होणारी गर्दी पाहता भाविकांची काळजी घेतली जाणार आहे. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला योग्य त्या सूचना दिल्या.
बैठकीस अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, जि. प. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी दादासाहेब वानखेडे, परळीचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, उपजिल्हा रुग्णालाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनेश कुरमे, परळी विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड,अधीक्षक अभियंता सुनील होळंबे, पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सुरेश चाटे,अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीस देवस्थान समितीच्या वतीने परळीचे तहसीलदार व श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश शेजुळ, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त प्रा. बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रा. प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, गुरूप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, रघुवीर देशमुख, शरद मोहरीर, निळकंठ पुजारी उपस्थित होते.