बीडच्या इतिहासातील पहिले संस्कृत नाट्य ‘सुवर्णमध्य:’चे नाशिकमध्ये सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:45 PM2020-01-31T23:45:58+5:302020-01-31T23:49:25+5:30
नाट्य चळवळीत योगदान देणाऱ्या बीड येथील कलाकारांनी येथील नाट्य इतिहासातील पहिले संस्कृत नाटक ‘सुवर्णमध्य:’ नाशिकमध्ये सादर करुन रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.
बीड : नाट्य चळवळीत योगदान देणाऱ्या बीड येथील कलाकारांनी येथील नाट्य इतिहासातील पहिले संस्कृत नाटक ‘सुवर्णमध्य:’ नाशिकमध्ये सादर करुन रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली. महाराष्टÑ शासनाच्या वतीने संस्कृत राज्य नाट्य महोत्सवात नाशिकच्या परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ‘सुवर्णमध्य:’ चा बहारदार प्रयोग झाला.
चौपदरी महामार्ग तयार करताना वस्तीमधील निरक्षर कचरा वेचणाºया मुलांनी त्यांचे झाड कापू नये यासाठी मतीमंद मुलीच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या रोमांचकारी आंदोलनावर आधारलेले ‘सुवर्णमध्य:’ हे संस्कृत नाटक आहे. वर्तमान पर्यावरणाच्या स्थितीवर भाष्य करणाºया या नाटकाची निर्मिती युवा प्रबोधनने परिवर्तन प्रतिष्ठानच्या मदतीने केली. लेखन व दिग्दर्शन जेष्ठ नाटककार दिग्दर्शक डॉ. सतीश साळुंके यांनी केले तर अभ्यासक प्रा.नितेश अग्रवाल यांनी नाटकाचा संस्कृत अनुवाद केला.
या नाटकात पूर्वा खडकीकर, श्रावणी व्यवहारे, गौरी जवकर, श्रद्धा निर्मळ, अनुष्का केकाण, सानिका खांडे, विजय बाबर, सत्यजित पवार व प्रथमेश खडकीकर यांनी अभिनय केला. अशोक घोलप यांनी नाटकाची प्रकाश व संगीतयोजना केली. श्रुष्टी देशमुखने रंगभूषा व वेशभूषा, तर नेपथ्य सुधा साळुंके यांनी केले. अष्टविनायक शेंगुडे व धायगुडे यांनी त्यांना सहकार्य केले. अ.भा.नाट्य परिषद बीड शाखेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी बीडच्या नाट्य इतिहासातील पहिले संस्कृत नाट्य सादर केल्याबद्दल परिवर्तनच्या कलाकारांचे कौतुक केले.
पर्यावरण संवर्धनाचा नाटकातून संदेश
वस्तीत राहणाºया मंदी नावाच्या एका मतीमंद मुलीला शाळेतील उपक्रमांतर्गत झाडाचे एक लहानसे रोप बक्षीस स्वरुपात मिळते.
आपल्या कचरा वेचणाºया मित्रांसोबत ती ते रोपटे झोपडीसमोर लावते. त्याला मुले प्राणपणाने वाढवतात.
दरम्यान झाड लावलेल्या ठिकाणावरून महामार्ग जाणार असतो त्यात हे झाड तोडण्यात येणार असते. त्याविरुद्ध कचरा वेचणाºया आपल्या मित्रांना सोबत घेऊन मंदी आंदोलन करते.
शेवटी शासन व अभियंते अशी योजना करतात की झाड ही वाचेल व महामार्गदेखील तयार होईल. विकास तर आवश्यक आहेच.
पण विकास करताना पर्यावरणाचा नाश होता कामा नये हाच विकासाचा खरा ‘सुवर्णमध्य:’ असल्याचा संदेश हे नाटक देते.