जिल्हा परिषदेत धिंगाणा घालणारा राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक थेट निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 11:58 PM2024-01-08T23:58:03+5:302024-01-08T23:59:14+5:30
निलंबित करण्यात आलेले शिक्षक आमटे हे प्राथमिक पदवीधर असून सध्या त्यांच्याकडे आष्टी तालुक्यातील दौलावडगाव केंद्राचा प्रभारी पदभार आहे.
बीड : मद्यपान करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गोंधळ घातल्याप्रकरणी राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विजय कुंडलिक आमटे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने थेट निलंबित करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
निलंबित करण्यात आलेले शिक्षक आमटे हे प्राथमिक पदवीधर असून सध्या त्यांच्याकडे आष्टी तालुक्यातील दौलावडगाव केंद्राचा प्रभारी पदभार आहे. पदोन्नतीच्या अनुषंगाने ५ जानेवारी रोजी ते बीड येथे जिल्हा परिषदेत आले होते. सकाळी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुपारी पुन्हा शिक्षण विभागात येऊन पदोन्नतीबाबतची संचिका तत्काळ प्रस्ताविक का करत नाहीत? अशी विचारणा करत गोंधळ घातला.
‘माझे काम लवकर करा, नाही तर मी इमारतीवरून उडी मारीन’ असा इशारा देत शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती. याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मद्यापान करून शिक्षक आमटे यांनी धिंगाणा घातल्याची तक्रार केली होती. त्याअनुषंगाने सोमवारी शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेऊन आलेली तक्रार मांडली. यावर पाठक यांनी गांभीर्याने दखल घेत शिक्षक विजयकुमार आमटे यांना गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांच्यावर जिल्हा परिषद अधिनियमानुसार निलंबित करण्यात आले.