माजलगावात सभापती पुत्राचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:00 AM2018-05-26T01:00:09+5:302018-05-26T01:00:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील नगर परिषदेच्या नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने त्याच्या खाजगी पोल्ट्रीफार्मवर एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत नगराध्यक्षांच्या दालनात उपस्थित नगरसेवकांसमोरच विद्युत अभियंता शतानिक जोशी यांना खुर्चीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान घडली.
शुक्रवारी दुपारी येथील नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्षांसह आठ ते दहा नगरसेवक बसलेले होते. या वेळी नियोजन व विकास सभापती हनिफाबी शेख बशीर यांचा मुलगा शेख इम्रान याने विद्युत अभियंता जोशी यांना तेथे बोलावून घेतले. शहरालगत असलेल्या माझ्या पोल्ट्रीफार्मवर तू एलईडी लाईट का लावत नाहीस म्हणत अध्यक्षांसमोरच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावर संबंधित अभियंत्याने मला असे करता येणार नाही असे उत्तर दिल्यावर या सभापती पुत्राचा पारा चढला. त्याने बाजूला असलेली खुर्ची उचलून अभियंता जोशी यांच्या डोक्यात घातली. गचुरे धरुन शिवीगाळ करत कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. प्रकार वाढत असल्याचे पाहून काही नगरसेवकांनी यात हस्तक्षेप करुन सोडवासोडव केली.
घटना घडल्यानंतर न.प. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले. ते पोलीस ठाण्यात गेले. त्यांच्या पाठोपाठच नगराध्यक्ष सहाल चाउस व आठ ते दहा नगरसेवकही पोलीस ठाण्यात आले. अखेर नोकरी करायची आहे या भितीपोटी कर्मचा-यांनी माघार घेवून परतीचा रस्ता धरला.
आॅनलाईन तक्रार केली
नगर परिषदेत आमच्या कर्मचा-यास मारहाण केल्यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो. तेथे पदाधिकारी व नगराध्यक्षांनी तेथे येऊन सदर कर्मचारी व आमच्यावर दबाव आणला. आम्ही आॅनलाईन तक्रार केली असून, सोमवारपासून कामबंद आंदोलन करणार आहोत.
- शिवहर शेटे, अध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना.
प्रकार घडला, मध्यस्थी केली
सदरील प्रकार हा माझ्यासमोरच झाला. त्यावेळी संबंधित सभापती पुत्रास आवरले. तसेच पदाधिकारी व कर्मचारी यांच्यात वितुष्ठ निर्माण होवू नये म्हणून आम्ही मध्यस्थी करुन कर्मचा-यांना तक्रार देण्यापासून परावृत्त केले.
- सहाल चाउस, अध्यक्ष, नगर परिषद, माजलगाव