डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

By सोमनाथ खताळ | Published: August 27, 2024 06:55 PM2024-08-27T18:55:15+5:302024-08-27T18:55:46+5:30

सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

Prevent dengue, malaria; 32 Divisional Committee for Control | डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

बीड : राज्यात कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच विविध विभागांच्या समन्वयासाठी एकत्रित आढावा घेण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समिती पुनर्गठीत करावी, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या होत्या. त्यानुसार उच्चस्तरीय समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. याचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव हे राहणार असून, सदस्य म्हणून इतर ३२ विभागांचे अधिकारी असणार आहेत. सोमवारी याबाबत शासन निर्देश काढण्यात आले आहेत. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना आळा बसणार आहे.

राज्यातील संसर्गजन्य आजारावर प्रतिबंध व नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग, राष्ट्रीय विषाणू परिषद, पुणे, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांच्यात समन्वय आवश्यक आहे. राज्यात कीटकजन्य, जलजन्य व प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक प्रभावी उपाययोजनांसाठी व एकत्रित आढाव्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य व जिल्हास्तरीय समिती पुनर्गठन करण्याबाबतचा प्रस्ताव आरोग्य आयुक्तांनी सादर केला होता. त्यानुसार आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी बैठका घेऊन उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे ही समिती गठीत केली आहे. यामुळे सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.

राज्यस्तरीय समितीत कोण?
आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. त्यात इतर संबंधित ३२ विभागांच्या सदस्यांचा समावेश आहे. सहसंचालक, आरोग्य सेवा (हि. ह. व ज. ज. रोग), पुणे हे याचे सचिव असतील. दर ३ महिन्यांतून एकदा बैठक घेऊन साथरोग व आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. राज्यातील साथरोग परिस्थितीचे विश्लेषण करून साथरोग उद्भवाची कारणमीमांसा तसेच करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजनांची रूपरेषा, राज्यातील सध्याच्या साथरोग नियंत्रण व्यवस्थेचा अभ्यास करून त्यात आवश्यक बदल सुचवायचे आहेत.

जिल्हा समितीत कोण असणार?
जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल. यात इतर २० विभागांचे सदस्य असतील. जिल्हा आरोग्य अधिकारी या समितीचे सचिव असतील. राज्याच्या समितीप्रमाणेच यांनाही काम करावे लागेल. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार व आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही उच्चस्तरीय समिती गठीत केली जात आहे. याचा शासन आदेश निघाला आहे. ही समिती अभ्यास करून उपाय सुचवेल. त्यामुळे कीटकजन्य, जलजन्य, प्राणीजन्य आजारांच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणासाठी लाभ होणार आहे.
-डॉ. आर. बी. पवार, सहसंचालक, आरोग्य सेवा, पुणे

मलेरियाची राज्याची आकडेवारी काय सांगते ?
वर्ष - रुग्ण - मृत्यू
२०१९ - ८८६६ - ७
२०२० - १२९०९ - १२
२०२१ - १९३०३ - १४
२०२२ - १५४५१ - २६
२०२३ - १६१५९ - १९
ऑगस्ट २०२४ पर्यंत - ११८०८ - ७

डेंग्यूची राज्याची आकडेवारी काय सांगते?
वर्ष - रुग्ण - मृत्यू

२०१९- १४८८८ - ४९
२०२० - ३३५६ - १०
२०२१ - १२७२० - ४२
२०२२ - ८५७८ - २७
२०२३ - १९०३४ - ५५
ऑगस्ट २०२४ पर्यंत - ८३१५ - १५
 

Web Title: Prevent dengue, malaria; 32 Divisional Committee for Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.