गायरान जमिनीसाठी भांडणाऱ्या दोन्ही गटांवर प्रतिबंधक कारवाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:39 AM2021-09-17T04:39:56+5:302021-09-17T04:39:56+5:30
कडा : टाकळी अमिया येथील गायरान जमीन ही ग्रामपंचायतीच्या नावे असून येथील गायरान हक्क सांगण्यावरून व कसण्याच्या कारणावरून अनुसूचित ...
कडा : टाकळी अमिया येथील गायरान जमीन ही ग्रामपंचायतीच्या नावे असून येथील गायरान हक्क सांगण्यावरून व कसण्याच्या कारणावरून अनुसूचित जाती, जमातीतील लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. प्रशासनाने भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन्ही गटातील १७ लोकांवर प्रतिबंधक कारवाई केली.
आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया येथील गायरान जमीन ग्रामपंचायतीच्या नावे असून हे क्षेत्र ‘तुझं नाही, माझं’ म्हणत वाद निर्माण झाला होता. याची माहिती प्रशासनाला समजताच आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे, तहसीलदार राजाभाऊ कदम, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन ज्याच्याकडे कसत असल्याचे पुरावे असतील त्यांनी सादर करावे, आपापसात भांडणे करू नका अशा सूचना केल्या होत्या. गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडून दोन्ही गटामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वर्तणूक सुधारणा करावी, तहसीलदारांच्या पुढील आदेशापर्यंत भांडण,तंटा न करता शांतता राखावी असे निर्देश देत दोन्ही गटातील लोकांवर आष्टी तहसीलमध्ये कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत.
लोकमतने वास्तव आणले होते समोर
टाकळी अमिया येथील गायरान 'तुझं नाही माझंच ' यावरून जमिनीचा वाद भडकतोय असे वृत्त लोकमतने १२ सप्टेंबर रोजी प्रकाशित करून वास्तव समोर आणताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अनुसूचित जाती, जमातीतील दोन्ही गटातील १७ लोकांवर प्रतिबंधक कारवाया केल्या असून तूर्तास वाद शमणार आहे. तो कायमचा मिटावा म्हणून ठोस उपाय करण्याची मागणी आहे.