कोबीला एक रुपयाचा भाव, काढायलाही परवडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:12+5:302021-03-29T04:20:12+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : लाॅकडाऊन व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ते परवडेना झाले. पात्रूड येथील शेतकऱ्याने शेतात कोबीची लागवड केली; परंतु कोबीला बाजारपेठेत किलोला केवळ एक रुपयाच भाव मिळत असल्याने ती काढायला देखील परवडत नसल्याने ही कोबी शेतातच सुकू लागली आहे.
माजलगाव - पात्रूड या रस्त्यावर पात्रूड येथील शेतकरी अशोक नारायणराव आगरकर यांची तीन एकर शेती आहे. या शेतीवर सहा व्यक्तींची उपजीविका भागवली जाते. वर्षानुवर्षे वडिलोपार्जित या शेतात भाजीपाल्याची लागवड केली जाते. अशोक आगरकर हे आपल्या शेतात वांगी, कोबी, पालक, कोथिंबीर, भोपळा आदी भाजीपाल्याची पिके घेत असतात. यातून खर्च जाऊन चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असे. मागील वर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांना असाच भाजीपाला, फळे फेकून द्यावी लागली होती. यावर्षी परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरण, तलाव, नद्या, नाले भरून वाहू लागले होते. पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारे झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. यामुळे मागील सहा महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव गडगडले. यामुळे शेतकऱ्यांना लागलेल्या भाजीपाल्यातून वाहतुकीचाही खर्च देखील निघणे अवघड झाले आहे.
पात्रूड येथील शेतकरी अशोक आगरकर यांनी अर्धा एकर शेतात कोबीची लागवड केली होती. बाजारपेठ कोबीला एक रुपया किलो भाव असल्याने त्या कोबीच्या रोपांचाही खर्च निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याने या कोबीला फवारणी देखील केली नाही. त्यामुळे या कोबीला मोठ्या प्रमाणावर कीड लागल्याचे चित्र पहावयास मिळत होते. याच बरोबर या शेतकऱ्याने आपल्या शेतात वांगी व कोथिंबिरीचीही लागवड केली होती. त्या दोन्हींलाही भावच नसल्याने व हातात पैसेच येत नसल्याने पुढील वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न या शेतकऱ्यास पडला आहे.
शेतकऱ्यांच्या पीक, भाजीपाल्याला भावच नसल्याने आता कधी शेतकऱ्यांच्या जीवनात अच्छे दिन येणार, असा प्रश्न पडला आहे. यावर्षी शेतीतून आमचा खर्चच निघणे मुश्कील झाल्याने मुलांचे शिक्षण कसे करावे व काय खावे. यामुळे झोप उडाली आहे.
----अशोक आगरकर, शेतकरी
===Photopath===
280321\img_20210328_122640_14.jpg