शाहूनगर, पेठ बीड भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:11+5:302021-06-16T04:45:11+5:30
नगराध्यक्ष : स्थानिक नागरिकांची अडचण दूर होणार बीड : शहरातील शाहूनगर आणि पेठ बीड भागात नागरिकांना सोयीच्या दृष्टीने नगर ...
नगराध्यक्ष : स्थानिक नागरिकांची अडचण दूर होणार
बीड : शहरातील शाहूनगर आणि पेठ बीड भागात नागरिकांना सोयीच्या दृष्टीने नगर पालिकेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.
शाहूनगर भागात तसेच पेठ बीड भागात गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या मागासलेले, दुर्बल घटकातील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. या दोन्ही भागातील नागरिकांची खूप दिवसांची मागणी गृहित धरून या भागात आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष क्षीरसागर म्हणाले की, शाहूनगर आणि पेठ बीड हे दोन्ही भाग जिल्हा रुग्णालयापासून बऱ्याच दूर अंतरावर असल्याने रुग्णाला बीड जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. या भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तसेच अडचणीच्या काळात योग्य वेळी उपचार मिळावेत, यासाठी बीड नगर पालिका प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. या दोन्ही ठिकाणी होत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे आसपासच्या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.
शाहूनगर भागात आणि पेठ बीड भागात नगर पालिकेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले व नगराध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. याप्रसंगी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे, बलभीमराव जाहेर, पेठ बीड पो. स्टे.चे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, सय्यद सादेक अली, अमृत सारडा, सतीश पवार, शिवाजीराव जाधव, नगरसेवक भास्कर जाधव, किशोर पिंगळे, शेख इलियास, विकास जोगदंड, प्रेम चांदणे, संतोष गायकवाड, शुभम धूत, यांच्यासह बीड नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.