प्राथमिक शिक्षकेने केजच्या गटशिक्षणाधिकाऱ्यास कार्यालयात येऊन बदडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 04:46 PM2019-03-07T16:46:17+5:302019-03-07T16:48:28+5:30
शिक्षिका म्हणतात.. अपशब्द वापरले....
केज (बीड ) : रजेवर असलेल्या शिक्षिकेस केजचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी टपालासंदर्भात शिक्षिकेला फोन केला. फोनवर बोलताना झालेल्या संवादाच्या कारणावरून संतप्त झालेल्या शिक्षिकेने बेडसकर यांना कार्यालयात येऊन चांगलाच चोप दिला. या घटनेस खुद्द बीईओंनीच दुजोरा दिला आहे.
केज तालुक्यातील लहुरी केंद्रातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका या ५ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान अर्जित रजेवर होत्या. रजेवर असतानाही केज गटसाधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी त्यांना मोबाईलवर ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजुन ३६ मिनिटांनी संपर्क केला. टपाल घेऊन जाण्यासाठी केजला या, असे फर्मान सोडले. मात्र सदरील शिक्षिकेने मी रजेवर असल्याने येवु शकत नाही, असे सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी व सहशिक्षका यांच्यात फोनवरून झालेल्या संवादाने संतप्त झालेल्या शिक्षिकेने गुरुवारी दुपारी एक वाजता गटसाधन केंद्रात येवून कार्यालयातच गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांचे गचुरे धरुन मारहाण केली. विशेष म्हणजे बेडसकर मार खात असताना कार्यालयातील इतर एकही अधिकारी, कर्मचारी पुढे सरसावला नाही.
काय म्हणतात गटशिक्षणाधिकारी...
घडल्या प्रकाराबाबत गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांची भेट घेतली. त्यांना विचारले असता त्यांनी सदरील घटना घडल्याचे सांगितले. मात्र सदर प्रकार लहुरीचे केंद्र प्रमुख राख यांच्याकडील अतिरिक्त पदभार काढून घेतल्याने झाला असल्याचे त्यांचे म्हणने आहे. तसेच सदर शिक्षिका ही राख यांची नातेवाईक आहे. त्यांचा पदभार काढल्याने त्या चिडल्या आणि त्यांनी हा प्रकार केल्याचेही सांगण्यात आले. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचेही बेडसकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शिक्षिका म्हणतात.. अपशब्द वापरले....
तर सदरील शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी आपणास फोन करून अपशब्द वापरल्याने त्यांची मारहाण केल्याचे सांगितले. तसेच प्रकारानंतर गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर हे उपस्थितांना आपण त्यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने हा प्रकार घडल्याचे सांगत होते, असे शिक्षिकेने सांगितले. तसेच या प्रकरणाशी राख यांचा काहीही संबंध नसल्याचेही त्या म्हणल्या.
बीईओंची कारकिर्दच वादग्रस्त
बेडसकर यांना यापूर्वीही महिला शिक्षिकेकडुन लाच स्विकारता रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांना माजलगाव येथे विस्तार अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला होता. केजचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने त्यांना प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून केज गटसाधन केंद्रात दोन महिन्या पूर्वी पाठविले होते. येथेही त्यांनी महिला शिक्षिकेचा मार खालला. बेडसकर यांची कारकिर्दच वादग्रस्त ठरत आहे.