प्रभू वैद्यनाथाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:24 AM2019-10-18T00:24:20+5:302019-10-18T00:25:03+5:30

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले येथील प्रभू वैद्यनाथाचे गुरूवारी सकाळी १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले व प्रभू वैद्यनाथाची आरती पूजा केली.

Prime Minister Narendra Modi's visit to Prabhu Vaidyanatha | प्रभू वैद्यनाथाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन

प्रभू वैद्यनाथाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दर्शन

Next
ठळक मुद्देपंतप्रधानांच्या हस्ते वैद्यनाथास आरती पूजा : मंदिर परिसरात सकाळपासूनच सुरक्षा व्यवस्था केली होती तैनात

संजय खाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले येथील प्रभू वैद्यनाथाचे गुरूवारी सकाळी १२ च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले व प्रभू वैद्यनाथाची आरती पूजा केली. मंदिरात प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी पंतप्रधान पहिल्यांदाच आले. पंतप्रधान येणार असल्याने वैद्यनाथ मंदिर परिसरात सकाळपासूनच सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही वैद्यनाथ मंदिरात रांगेत दर्शनासाठी काही भाविक होते. पंतप्रधान मोदी येण्यापूर्वी व त्यांचे दर्शन झाले की पाचच मिनिटांत सर्व भाविकांचे दर्शन झाले.
बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात गुरूवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ठेवण्यात आली होती.
सभास्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाल्यानंतर कारने वैद्यनाथ मंदिरात ११.५७ वाजता आगमन झाले. मंदिरात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे त्यांच्यासमवेत उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे दोघे सोबत वैद्यनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी आले. नंदीचे दर्शन घेऊन वैद्यनाथाच्या गाभाऱ्यात आले व प्रभू वैद्यनाथास मोदी यांनी आरती पुजा केली. यावेळी पूजेसाठी वैद्यनाथ मंदिराचे अनिल पुजारी हे देखील उपस्थित होते.
वैद्यनाथ मंदिरात सकाळपासून वैद्यनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख, विश्वस्त नंदकिशोर जाजु, प्रा. प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरूप्रसाद देशपांडे यांच्यासह इतर विश्वस्त उपस्थित होते.
मंदिरात नरेंद्र मोदी यांचे दर्शन झाल्यानंतर लागलीच भाविकांनीही दर्शन घेतले. भाविक वैजनाथ हजारे व शिवा धुमाळ म्हणाले की, आज वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलो असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरून बघण्याचा योग आला.
सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी मंदिरात आगमन झाले व दुपारी १२ वा. ९ मिनिटाला मोदी यांनी दर्शन करून मंदिराच्या बाहेर थांबलेल्या कारमध्ये बसून सभास्थळाकडे रवाना झाले.
आज सकाळपासूनच वैद्यनाथ मंदिर परिसरात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून गणपती मंदिर, शनी मंदिर, प्रतिवैद्यनाथ मंदिर, हालगे गार्डन रोडकडून येणारी सर्व वाहने थांबविण्यात आली. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत एकही वाहन वैद्यनाथ मंदिरासमोर थांबलेले नव्हते. मोदी हे वैद्यनाथाचे दर्शन करून गेल्यानंतर १० मिनिटांनी वाहतूक व्यवस्था पूर्ववत झाली.

Web Title: Prime Minister Narendra Modi's visit to Prabhu Vaidyanatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.