प्रधानमंत्री पिक विमा योजना राफेल पेक्षाही मोठा घोटाळा : पी. साईनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:02 PM2019-01-14T17:02:48+5:302019-01-14T17:21:21+5:30
विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत.
माजलगाव (बीड ) : प्रधानमंत्री पीक विमा योजना ही या सरकारच्या काळातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हा घोटाळा राफेल पेक्षाही मोठा घोटाळा असल्याचा आरोप जेष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी केला. ते दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.
माजलगाव पत्रकार संघातर्फे दर्पण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पी साईनाथ म्हणाले की, राफेल खरेदी प्रक्रिया एकदाच होणारी आहे मात्र, प्रधानमंत्री पिक विमा योजना वर्षानुवर्ष सुरूच आहे. ही योजना सर्वात मोठी फसवी योजना असून त्यातून खाजगी कंपन्यांना नफा मिळवून देण्यात येत आहे. यामुळे सरकारी संस्था तोट्यात आल्या तर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे,असेही ते यावेळी म्हणाले.
आमदार नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, विमा कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही,शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या दरवेळी नाव बदलून समोर येत आहेत. यावेळी पत्रकार गंमत भंडारी आणि वसंत साळुंके यांना समाज भूषण आणि दर्पण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात नगरपालिका अध्यक्ष सहाल चाऊस, मोहन जगताप, सभापती अशोक डक, उपविभागीय अधिकारी प्रियंका पवार आदींची उपस्थिती होती.