प्राचार्य सावंत यांचे पुरोगामी विचार कायम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:10+5:302021-02-15T04:30:10+5:30
बीड : आयुष्यभर पुरोगामी व सत्यशोधक विचार जपणारे व ज्ञानदानाचे पवित्र कार्य मोठ्या निष्ठेने करुन पिढ्या घडविणारे प्राचार्य पा.बा. ...
बीड : आयुष्यभर पुरोगामी व सत्यशोधक विचार जपणारे व ज्ञानदानाचे पवित्र कार्य मोठ्या निष्ठेने करुन पिढ्या घडविणारे प्राचार्य पा.बा. सावंत हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारांची ज्योत कायम प्रकाश देत राहील. त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.
प्राचार्य पा.बा. सावंत यांचा स्मृती समारोह रविवारी कॅनॉल रोडवरील एका मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे होते. आ. विक्रम काळे, आ.संदीप क्षीरसागर,माजी आ.राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे,उषा दराडे,प्रा.सुनील धांडे, माजी मंत्री प्रा.सुरेश नवले,नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्रा.सुशीला मोराळे, मनीषा तोकले,अशोक हिंगे, प्रा.अर्जुन तनपुरे, एम.एल.देशमुख, प्राचार्य राम पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ व प्राचार्य पा.बा. सावंत यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रतिभा गायकवाड यांनी जिजाऊ वंदना गायली.
पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, प्राचार्य पा.बा. सावंत यांनी शेवटपर्यंत विचारांचे पावित्र्य जपले. सार्वजनिक जीवनात त्यांनी जो विचार मांडला तो ते जगले. सर्वधर्म समभाव जपतानाच समाजातील वंचित, उपेक्षितांच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्य वेचले. महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती त्याकाळी त्यांनी महिलांची परिषद घेऊन सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचे विचार मांडले होते. सामाजिक, राजकीय चळवळीत येण्यासाठी महिलांना प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांच्या जीवनकार्याचा वारसा पुढे नेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राचार्य पा.बा. सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला.दादासाहेब सादोळकर लिखित प्राचार्य पा.बा. सावंत यांच्या जीवनकार्यावरील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन सुधाकर शिंदे, संतोष डोंगरे यांनी केले आभार माजी न.प.सभापती सुभाष सपकाळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्मृती समारोह समितीचे स्वागताध्यक्ष महारुद्र काळे,प्रा.शिवाजी खांडे, जे.पी.शेळके, छाया सोंडगे, हरिश्चंद्र चव्हाण, प्रा. शिवदास बंड, डॉ.उध्दव घोडके, अनिता शिंदे, कमल निंबाळकर, अभिमान खरसाडे, प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे, प्राचार्य अनंत डमरे, सखाराम कळासे, भारत सावंत, ॲड.शशिकांत सावंत, गंगाधर लोणकर, भारती ढगे,अशोक माने आदींनी परिश्रम घेतले.