कैदी बनले टाळकरी अन् माळकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 01:31 AM2018-09-06T01:31:30+5:302018-09-06T01:32:26+5:30

विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मन:परिवर्तन होत असल्याचे दिसले. अनेकांनी हातात टाळ, मृदंग, वीणा, पेटी घेत विठ्ठल नामाचा गजर केला. यामुळे संपूर्ण कारागृह भक्तीमय झाले होते.

The prisoner became a prisoner and the merchant! | कैदी बनले टाळकरी अन् माळकरी !

कैदी बनले टाळकरी अन् माळकरी !

Next

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विविध गुन्ह्यांत शिक्षा भोगत असलेले कैदी आणि बंद्यांच्या मन:परिवर्तनासाठी युवकांनी उचललेले पहिले पाऊल यशस्वी ठरले आहे. सात दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सवाचा बुधवारी थाटात ‘काला’ झाला. गंभीर गुन्ह्यातील कैद्यांमध्ये सात दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमांमुळे मन:परिवर्तन होत असल्याचे दिसले. अनेकांनी हातात टाळ, मृदंग, वीणा, पेटी घेत विठ्ठल नामाचा गजर केला. यामुळे संपूर्ण कारागृह भक्तीमय झाले होते.

कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांच्या पुढाकारातून व प्रा.नाना महाराज कदम, सुरेश जाधव, माणूसकी ग्रुपच्या सहकार्याने मागील आठ दिवसांपासून येथील जिल्हा कारागृहात श्रावण विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच येथे विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
कीर्तन, प्रवचन, भारूड, भजन, पोवाड्यांच्या माध्यमातून कैद्यांचे मनोरंजनाबरोबरच त्यांचे मन:परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. बुधवारी प्रा.नाना महाराज कदम यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अधीक्षक एम.एस.पवार, ह.भ.प. हरिदास जोगदंड, प्रा.संभाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत काल्याची दहीहंडी फोडली. कार्यक्रमामुळे वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी ओंकार महाराज कागदे, विष्णूपंत महाराज लोंढे, नवनाथ महाराज नाईकवाडे, अतुल महाराज येवले, अंगद महाराज सातपुते, संदीप महाराज आमटे, गणेश महाराज बांडे, रेवण महाराज वायभट, गोरख महाराज वायभटसह कारागृह कर्मचारी, कैदी, बंदी आदी उपस्थित होते.

‘दो आंखे बारह हाथ’ची झाली आठवण
मराठवाड्यात बीड जिल्हा कारागृहात सलग सात दिवस कीर्तन महोत्सव प्रथमच झाला. या महोत्सवात अध्यात्मातून प्रबोधनाचा प्रयत्न करण्यात आला. कारागृहातील बंद्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून व्ही. शांताराम यांच्या ‘ दो आंखे बारह हाथ’ या चित्रपटाची आठवण अनेकांना झाली. अशा उपक्रमांमुळे कैदी आणि बंद्यांच्या मनात नक्कीच परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कारागृह प्रशासनाकडून प्रमाणपत्र
कीर्तन महोत्सवाचे आयोजन करून तो यशस्वी पार पाडल्याबद्दल कारागृह प्रशासनाच्या वतीने प्रा.नाना महाराज कदम, सुरेश जाधव व प्रा.संभाजी जाधव यांना कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी प्रमाणपत्र देऊन गौरविले. यामुळे प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया प्रा.कदम महाराज यांनी व्यक्त केली.

मी बदललो, तुम्ही बदला - थोरात
सहा वर्षांपूर्वी मी पण याच कारागृहात एक रात्र राहिलो आहे. त्यावेळी त्रास काय असतो, हे समजले आणि बदलण्याचा निर्णय घेतला. ज्या कारागृहात आरोपी म्हणून आलो आज त्याच कारागृहाच्या पालन पोषण समितीचा अध्यक्ष आहे. आणि ज्या रूग्णालयात पाच दिवस आरोपी म्हणून कोठडीत उपचार घेतले त्याच रूग्णालयाचा आज मी बॉस आहे. त्यामुळे झालेल्या घटना विसरून नवे आयुष्य सुरू करावे. प्रत्येकाने बदलण्याची जिद्द ठेवावी. मी जसा बदललो, तसे तुम्ही पण बदलू शकता, असा विश्वास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी कैद्यांना दिला. यावेळी डॉ.थोरात भावनिक झाले होते.

कीर्तन महोत्सव नव्हे आनंदोत्सव - पवार
सात दिवस चाललेला हा कीर्तन महोत्सव नसून आमच्या बंदी, कैद्यांसाठी आनंद देणारा उत्सव ठरला. त्यांच्यात या महोत्सवामुळे काही प्रमाणात का होईन बदल झाला आहे. हे पाहून आनंद होत आहे. यापुढेही कैद्यांच्या मन:परिवर्तनासाठी असे कार्यक्रम घेण्याची गरज आहे. आमच्याकडून सर्व सहकार्य राहील. या आनंदोत्सवाची सांगता झाल्याचे दु:ख होत असल्याचे कारागृह अधीक्षक एम.एस.पवार यांनी सांगितले.

पोलीस-कैद्यांनी लुटला फुगडीचा आनंद
काल्याचे कीर्तन सुरू होण्यापूर्वी कारागृहात दिंडी काढण्यात आली. यावेळी कैद्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत मृदंगाच्या तालावर ठेका धरला. तर दिंडी दरम्यान, आपण कोण आहोत, हे विसरून पोलीस, बंदी तसेच कैद्यांनी फुगड्या खेळल्या. यावरून कारागृहातील कैदी आणि बंद्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला. त्यांचे मन: परिवर्तन करण्यात यश आल्याचे दिसून येते.

Web Title: The prisoner became a prisoner and the merchant!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.