कोरोना काळात पॅरेलवर असताना फरार झालेला खून प्रकरणातील कैदी तीन वर्षांनी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:16 PM2023-11-02T15:16:10+5:302023-11-02T15:18:17+5:30
तीन वर्षानंतर अंभोरा पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या
- नितीन कांबळे
कडा- खून प्रकरणात शिक्षा भोगत असताना पॅरेल रजेवर बाहेर आल्यानंतर फरार झालेला कैदी तीन वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला आहे. आज कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हनुमंत हौसराव कवचाळे ( रा.शिरापूर ता.आष्टी) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील हनुमंत हौसराव कवचाळे ( ३८ ) याने साथीदारासह कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीचा २०१६ मध्ये खून केला होता.या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात हनुमंत कवचाळे याच्यासह साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपी कवचाळे हा छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षा भोगत होता.
दरम्यान, २०२० मध्ये शिक्षा भोगत असताना कोरोना काळात तो पॅरेल रजेवर बाहेर आला. मात्र, मुदतीत परत न जाता तो फरार झाला होता. अखेर तीन वर्षानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात अंभोरा पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलिस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ याच्यासह कडा पोलिस चौकीचे पोलिस अंमलदार दिपक भोजे, सचिन गायकवाड, महेश जाधव याच्या मदतीने करण्यात आली.