पॅरेलवरील कैदी दोन वर्षांपासून फरार; दोनदा हुलकावणी दिली, अखेर एका हॉटेलात सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 07:49 PM2024-08-21T19:49:20+5:302024-08-21T19:50:00+5:30
पॅरेलवर आल्यानंतर फरार असलेला कैदी पकडला, अंभोरा पोलिसांची कारवाई
- नितीन कांबळे
कडा (बीड): पॅरेल रजेवर कारागृहातून बाहेर आल्यानंतर २०२२ पासून दिलेल्या कालावधीत परत न जाता पोलिसांना गुंगारा देत असलेल्या फरार कैद्याला अंभोरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून मंगळवारी सायंकाळी ठाणे येथून अटक केली आहे. अमीर सय्यद ( रा.शिरापूर ता.आष्टी) असे पकडलेल्या कैद्याचे नाव असून तो ठाण्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता.
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील अमीर सय्यद हा आष्टी पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या एका खून प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सन २०२२ मध्ये तो कारागृहातून पॅरेल रजेवर बाहेर आल्यानंतर ठरलेल्या कालावधीत परत न जाता फरार झाला होता. त्याच्यावर अंभोरा पोलीस ठाण्यात कलम २२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. २० ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदरील कैदी हा ठाणे हद्दीतील एका हाॅटेल मध्ये असल्याचे अंभोरा पोलिसांना समजले. यावरून सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पथकासह जात कैद्याला २० ऑगस्ट रोजी सायंकाळच्या दरम्यान मोठ्या शिताफीने पकडून अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर याच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, शरद पोकळे यानी केली.
दोन वेळा पोलिसांना दिली हुलकावणी
सदरील कैदी एका ठिकाणी असल्याची दोन वेळा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा लावला होता पण तो दोन वेळेस हुलकावणी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. सदरील कैद्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून न्यायालयाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह येथे सोडण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी लोकमतला सांगितले.