बीडमध्ये महायुतीच्या मेळाव्यात वाद; बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्याने प्रीतम मुंडे संतापल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 09:28 PM2024-01-14T21:28:53+5:302024-01-14T21:29:36+5:30
Beed Politics News: बीडमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवर दिवंगत गोपीनाथ मुंडेचा फोटो नसल्याने मोठा वाद झाला.
Beed Pritam Munde : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली आहे. यंदाची निवडणूक महायुतीतून लढवली जाणार आहे. यासाठी भाजप, शिवसेना(शिंदे गट) आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) राज्यभर जिल्हानिहाय मेळावे आयोजित करत आहे. आज बीडमध्येही महायुतीचा मेळावा झाला. पण, यावेळी बीडच्या भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
बीडमध्ये आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बॅनरवरुन खासदार प्रीतम मुंडे नाराज झाल्या. याचे कारण म्हणजे, महायुतीच्या बॅनरवर भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटो नव्हता. बॅनरवरुन भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांच्या या नाराजीनाट्यानंतर तात्काळ आयोजकांना बॅनर बदलावे लागले.
काय म्हणाल्या प्रीतम मुंडे?
या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेंचा फोटो वगळल्यानंतर भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. "आपला एखादा नेता हयात असताना त्याचा फोटो लावला नसेल तर कार्यकर्ते आक्रमक होतात. पण, आज आपला नेता हयात नसताना, कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, याला मी सलाम करते. मी अशा विषयावर कधी बोलत नाही, पण आता बोलावं लागतंय. हे करणारे कुणीही असो, कुठलाही पक्ष असो, अशा गोष्टीचे यापुढे स्वागत केले जाणार नाही."
"ही भूमिका स्पष्ट करणे काळाची गरज होती. ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय राज्यात कुठलीही मोठी राजकीय घडामोड घडत नाही, त्यांचा फोटो प्रोटोकॉलमध्ये नाही, हे कारण पटणारे नाही. हा प्रशासकीय कार्यक्रम नव्हता, मग मुंडे साहेबांचा फोटो भाजपाच्या प्रोटोकॉल मध्ये का येत नाही? यापुढे मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर ते सहन करणार नाही," असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.