प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा, असे चालणार नाही; पंकजा मुंडेंचा दसरा मेळाव्यातून इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 05:51 AM2023-10-25T05:51:20+5:302023-10-25T05:52:00+5:30
आपण २०२४ साठी मैदानात उतरले असून, आता पडणार नाही, तर पाडणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, सावरगाव घाट (जि. बीड) : मी दोन महिने घरात बसले तर माझ्याविषयी अनेक वावड्या उठविण्यात आल्या. आता प्रीतमताई घरी बसतील, तुम्ही लढा असे कोणी म्हणणार असेल तर ते चालणार नाही, असा थेट इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला दिला.
राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दसरा मेळावा झाला. यावेळी त्यांनी सरकारला घरचा आहेर देत मनातील खदखद व्यक्त केली. मी आता घरात बसणार नाही. मैदानात उतरले आहे. पडणार नाही तर पाडणार, असा इशाराही त्यांनी दिला. मी गोपीनाथ गड तीन महिन्यांत बनवला; परंतु, सरकारतर्फे अजूनही स्मारक बनवले नाही, अशी खंतही व्यक्त केली.
राज्यात ड्रगचा मुद्दा गाजत आहे. आता हे कोणी आणले, कोणाच्या काळात आणले याला काही बोलण्यात अर्थ नाही. यात कोणीही असो, त्याला बेड्या ठोका आणि तरुणाईला वाचवा, असेही पंकजा म्हणाल्या.
नीतिमत्तेचे राजकारण राहिले नाही
शेतकरी सुखी आहे का, देशात अलबेल आहे का, विमा, अनुदान मिळाले का, शेतमजुरांच्या हाताला काम आहे का, असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, राज्यात नीतिमत्तेचे राजकारण राहिलेले नाही. तुमच्या मताला किंमत राहिली नाही, असेही त्या म्हणाल्या.
पडणार नाही, तर पाडणार; पण कोठून लढणार?
आपण २०२४ साठी मैदानात उतरले असून, आता पडणार नाही, तर पाडणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. असे असले तरी नेमके कोणत्या मतदारसंघातून लढणार, हे अजूनही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. कारण परळी मतदारसंघात युतीतीलच राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हेदेखील दावेदार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळविण्यासाठी या बहीण-भावांत रस्सीखेच होऊ शकते.
पंकजांचा इशारा का?
येत्या लोकसभा निवडणुकीत बीडमधून डॉ. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. यावर पंकजा यांनी उमेदवार बदलण्यास स्पष्ट नकार दिल्याने पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
धनंजय मुंडेंचे काय?
राज्यात भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) यांची युती असल्याने उमेदवारी देताना अडचणी येणार आहेत. परळीत सध्या पंकजा मुंडे दावा करीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास धनंजय मुंडे कोठून लढणार? हा प्रश्नच आहे.