खासगी डॉक्टरांनो, रेमडेसिवीर परत करा अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:37 AM2021-09-05T04:37:33+5:302021-09-05T04:37:33+5:30
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवल्याने जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना उसणवारीवर इंजेक्शन दिले होते. आतापर्यंत केवळ ...
बीड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवल्याने जिल्हा रुग्णालयाकडून खासगी रुग्णालयांना उसणवारीवर इंजेक्शन दिले होते. आतापर्यंत केवळ ३२१ इंजेक्शन परत आले असून, अद्यापही ४८५ इंजेक्शन येणे बाकी आहेत. त्यांना वारंवार स्मरणपत्र देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने आता जिल्हा शल्यचिकित्सकांनी १५ रुग्णालयांना पत्र काढत दोन दिवसांत इंजेक्शन न दिल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात मार्च ते जुलै या तीन महिन्यांत कोरोनाबाधितांचा आलेख उंचावला होता. या काळात रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्यावरच रुग्ण ठणठणीत होतो, असा दावा केला जात होता. त्यामुळे मागणी वाढली होती. परंतु इंजेक्शनचा तुटवडा असल्याने २३ खासगी रुग्णालयांना जिल्हा रुग्णालयाकडून लोन बेसवर ८०६ इंजेक्शन देण्यात आले होते. यातील केवळ आठ रुग्णालयांनी ३२१ इंजेक्शन परत केले असून, १५ रुग्णालयांकडे अद्यापही ४८५ बाकी आहेत. या सर्वांनाच वारंवार स्मरण पत्र देण्यात आलेले आहे. परंतु त्यांनी याला जुमानले नाही. आता या सर्वांना शुक्रवारी शेवटचे पत्र काढले असून, दोन दिवसांत इंजेक्शन परत न केल्यास भा.दं.स.१८६० च्या कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियम कायदा १८९७च्या तरतुदीप्रमाणे प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याचा किती फायदा होतो, हे येणाऱ्या दोन दिवसांत समजणार आहे.
या रुग्णालयांना काढले पत्र
बीडमधील धूत हॉस्पिटल १२०, सानप बाल रुग्णालय १०६, विठ्ठल हॉस्पिटल १३, पंचशील हॉस्पिटल २, नोबल हॉस्पिटल २३, कृष्णा हॉस्पिटल ६९, संजीवनी हॉस्पिटल ६१, नवजीवन हाॅस्पिटल २६, माजलगावचे यशवंत हॉस्पिटल २७, गेवराईचे आधार हॉस्पिटल १६, आष्टीतील ध्रुव हॉस्पिटल २, मोहरकर हॉस्पिटल ३, शिरूरचे ज्ञानसुधा हाॅस्पिटल १३, पुणे येथील केअर हॉस्पिटल चिंगळी १, समर्थकृपा हॉस्पिटल वाकड ३ या रुग्णालयांनी अद्यापही इंजेक्शन परत केलेले नाहीत.
उसणवारीवर दिलेले रेमडेसिवीर इंजेक्शन परत देण्याबाबत वारंवार पत्र देण्यात आलेले आहे. आता शेवटचे पत्र काढले असून दोन दिवसांची मुदत दिली आहे. इंजेक्शन परत न केल्यास भा.दं.स.१८६० च्या कलम १८८ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियम कायदा १८९७ च्या तरतुदीप्रमाणे प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड