आजारी रजा टाकून उघडला खाजगी दवाखाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:22 AM2019-11-18T00:22:29+5:302019-11-18T00:22:49+5:30
बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दाम्पत्याने आजारी रजा टाकून मागील चार महिन्यांपासून केंद्रात पाय ठेवलेला नाही. त्यांनी पाथरी येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे चौकशीत समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड तालुक्यातील ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर दाम्पत्याने आजारी रजा टाकून मागील चार महिन्यांपासून केंद्रात पाय ठेवलेला नाही. त्यांनी पाथरी येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे चौकशीत समोर आले आहे. या प्रकाराने पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
ताडसोन्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.मोहमद सिराज मो.इलियास व डॉ.सिद्दिकी जबीन हे दोन वैद्यकीय अधिकारी येथे नियुक्त आहेत. १ जुलै रोजी या दोघांनीही एकाचवेळी आजारी असल्याची कारण सांगून रजा टाकली. त्यानंतर त्यांचे प्रमाणपत्र मागविण्यात आले. मात्र, चार महिने उलटूनही त्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. याची चौकशी केली असता त्यांनी पाथरी (जि.परभणी) येथे खाजगी दवाखाना उघडल्याचे समोर आले आहे. सरकारी सेवेत असतानाही त्यांनी खाजगी दवाखाना उघडल्याने त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्यामार्फत नोटीस बजावली आहे. सरकारी रुग्णालये सोडून खाजगी दवाखाने चालविणाऱ्या सरकारी डॉक्टरांची रोज अनेक प्रकरणे समोर येत असल्याने आरोग्य विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या आरोग्य केंद्रात इतर डॉक्टरांच्या ड्युट्या लावल्याचे तालुका आरोग्य अधिकारी नरेश कासट यांनी सांगितले.
ग्रामस्थांनी केली होती तक्रार
आजारी रजा टाकण्यापूर्वी ग्रामस्थांनी या दोन्ही डॉक्टरांविरोधात तक्रार केली होती. बाहेरून औषधे आणायला लावणे, वेळेवर व नियमित केंद्रात हजर राहत नसल्याचे त्यात नमूद केले होते. त्यानंतर चार महिने याची चौकशी करण्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळ घातला. अखेर त्याचा अहवाल डीएचओंकडे सादर करताच त्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.