सरकारी डॉक्टरांना खाजगी सराव अंगलट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:44 PM2019-09-03T23:44:41+5:302019-09-03T23:45:21+5:30
सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे.
बीड : सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे तीन दिवसात खुलासा न केल्यास खाजगी रुग्णालयाची नोंदणीही रद्द केली जाणार आहे. ‘लोकमत’ने ३० आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करुन निदर्शनास आणले.
सरकारी रुग्णालयातील काही ठराविक डॉक्टर कामचुकारपणा करण्यासह सेवेत हलगर्जी करीत असल्याचे वारंवार समोर येत आहे. वेळेवर व तत्पर सेवा मिळत नसल्याने सर्वसामान्य रुग्ण खाजगी रुग्णालयाची पायरी चढतात. गलेलठ्ठ पगार असतानाही सरकारी डॉक्टर खाजगी सराव जोरात करुन लाखोंची कमाई करत असल्याचे समोर आले आहे. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सर्व वैद्यकीय अधिकाºयांकडून खुलासा मागविला आहे. त्यातच गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील आणखी प्रकरण समोर आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे यांनी दोन डॉक्टर अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. परंतु ते खाजगी रुग्णालयात सराव करीत असल्याचे डॉ.थोरात यांना सांगितले. त्यांनी तात्काळ दखल घेत या दोन्ही डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. वेळीच खुलासा सादर करुन कर्तव्यावर हजर राहण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच खुलासा समाधानकारक न आल्यास त्या दोघांच्याही संबंधित खाजगी रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्याबाबत कारवाई प्रस्तावित केली आहे.
रुग्णांची पळवापळवी करणारेही डॉक्टरच
सरकारी रुग्णालयात कार्यरत असताना आणि येथे मोफत उपचार करण्यास टाळाटाळ करुन काही डॉक्टर रुग्णांची पळवापळवी करतात. जिल्हा रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आले होते. मात्र, सद्यस्थितीत याला काही प्रमाणात आळा बसला आहे.
‘लोकमत’ने प्रकार आणला निदर्शनास
‘सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव’ या मथळ्याखाली ३० आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. तसेच इतर डॉक्टरही सरकारी रुग्णालयात कार्यरत असताना खाजगी सराव केला जात असल्याचे ‘लोकमत’ ने समोर वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. गंभीर दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सकांनी सर्वच डॉक्टरांना नोटीस बजावत खुलासा मागविला आहे.