बालदिन स्पर्धेची बक्षिसे प्रजासत्ताक दिनी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:27 AM2021-01-14T04:27:47+5:302021-01-14T04:27:47+5:30
बीड : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने ...
बीड : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत शासनाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बाल दिवस सप्ताहाचे आयोजन केले होते. भाषण, पत्रलेखन, स्वलिखित कविता वाचन, नाट्यछटा, एकपात्री, पोस्टर तयार करणे, निबंध लेखन, व्हिडिओ तयार करणे, इ-बाल साहित्य संमेलनाचे आयोजन अशा सात गटांत या उपक्रमांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातून ७२७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला. यातून तालुका व जिल्हा पातळीवरील निकाल, बक्षिसे, तसेच राज्य स्पर्धेत सहभागाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत असल्याने गाव ते जिल्हा पातळीपर्यंत शिक्षण विभागाची उदासीनता व समन्वयाचा अभाव दिसून आला. तालुका व जिल्हा पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके कधी मिळणार असा प्रश्न आहे. ‘लोकमत’ने विचारणा केल्यानंतर शिक्षण विभागाकडून हालचाली सुरू झाल्या. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्पर्धेत कोणी सहभाग घेतला, हे समजण्यासही विलंब लागला. विद्यार्थ्यांना प्राेत्साहन देण्याऐवजी सोपस्कर पार पाडण्याचे काम होत असल्याने भविष्यातील उपक्रमांवर प्रश्नचिन्ह आहे.
बालदिन सप्ताह उपक्रमातील तालुका व जिल्हा पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाच्या मेडीया व कम्युनिटी मोबीलायझेशन हेडमधून बक्षिसे दिली जाणार आहेत. अंतिम यादीनंतर कार्यवाही होईल.
-श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी
अंबाजोगाई १०३, गेवराई ८५, माजलगाव १०४, शिरूर ४५, आष्टी ७६, बीड ४९, परळी २३, पाटोदा १६४, धारुर ४३, केज तालुक्यातून ३५ विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदविला.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयांकडून तालुकास्तरासाठी सर्व गटातून ७८, तर जिल्हा पातळीवर २१ विद्यार्थ्यांना रोख स्वरुपातील बक्षिसे प्रजासत्ताक दिनापर्यंत मिळतील असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
सहभागी स्पर्धक ७२७
तालुकास्तर ०७८
जिल्हास्तर ०२१
राज्यस्तर ०२१