दहा वर्षांपासून रखडलेला अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाचा प्रश्न लागणार मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:31+5:302021-02-26T04:47:31+5:30
बीड : शहरात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहास दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. शासनाकडून निधी आला; परंतु नगरपालिकेच्या कारभारामुळे अल्पसंख्यांक मुलींच्या ...
बीड : शहरात अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहास दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. शासनाकडून निधी आला; परंतु नगरपालिकेच्या कारभारामुळे अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहासाठी जागाच उपलब्ध झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन जागा देण्यास टाळाटाळ करू लागल्याने आ. संदीप क्षीरसागर यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
अल्पसंख्यांक जागेबाबतच्या प्रस्तावाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सने बैठक घेण्यात आली. मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत अल्पसंख्यांक मुलींच्या वसतिगृहाच्या जागेबाबतचा प्रस्ताव तातडीने दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून, याबाबत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. आ. संदीप क्षीरसागर यांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून पालिका प्रशासनाच्या चुकांमुळे रखडलेला वसतिगृहाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे.
बीड शहरात अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी मंजुरी मिळाली. यामध्ये मुलींच्या वसतिगृहासाठी शासकीय जमीन पालिकेने उपलब्ध करून देणे गरजेचे होते. परंतु, पालिका प्रशासनाने टाळाटाळ करत हा प्रश्न दहा वर्षांपासून रखडत ठेवला. कोविडची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, २४ फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक बोलावण्यात आली. नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मंत्रालय, मुंबई येथूनच पालकमंत्री धनंजय मुंडे जॉईन झाले होते, तर आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासमवेत या बैठकीत सहभागी होते.
नगरपालिकेकडून दोन जागा वसतिगृहासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. एक खासबाग आणि दुसरी किल्ला मैदान. यापैकी अल्पसंख्यांक समाजाच्या शिष्टमंडळाच्या मागणीनुसार, खासबाग येथील जाग देण्यात यावी, अशी मागणी होती. खासबाग येथील जागा देण्यासाठी पालिका टाळाटाळ करू लागल्याने वाद निर्माण झाला आणि पालिकेने हा प्रश्न दहा वर्षांपासून रखडत ठेवला, असा आरोप आ. क्षीरसागर यांनी केला. न. प. अडत मार्केट परिसरातील जागा देत नसल्याने शिष्टमंडळाने डाक बंगला येथील जागेची मागणी आ. क्षीरसागर यांच्याकडे केली होती.
शिष्टमंडळाची चर्चा
जिल्हाधिकारी यांच्यासोबतही शिष्टमंडळाने संवाद साधला. यामध्ये माजी न. प. सभापती खुर्शीद आलम, माजी सभापती अशफाक इनामदार, समाजसेवक जावेद कुरेशी, नगरसेवक जैतुल्ला खान, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष बरकत पठाण, अॅड. इरफान बागवान, शेख रोईल, बाबा खान, समीर तांबोळी, शेख मेहराज, एवन मुजीब यांच्यासह आदी उपस्थित होते.
===Photopath===
250221\25bed_17_25022021_14.jpg
===Caption===
अल्पसंख्यांक जागेबाबतच्या प्रस्तावाबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सने बैठक घेण्यात आली.े जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासमवेत आ.संदिप क्षीरसागर हे या बैठकीत सहभागी होते.