तीन कारखान्यातून १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:04+5:302021-04-20T04:35:04+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून तीन साखर कारखान्यांमध्ये उसाचे सातत्याने गाळप सुरू असून, आतापर्यंत २१ ...
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यात मागील सहा महिन्यांपासून तीन साखर कारखान्यांमध्ये उसाचे सातत्याने गाळप सुरू असून, आतापर्यंत २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. त्याद्वारे १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादनही मिळवले. एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करणारा माजलगाव तालुका हा मराठवाड्यात प्रथम आहे.
माजलगाव धरणामुळे संपूर्ण तालुका हा मागील वीस वर्षांपासून सुजलाम सुफलाम झाला आहे. तीस वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी तेलगाव येथे सहकारी साखर कारखाना उभारल्याने या भागातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड सुरू केली. त्यानंतर माजी आ. बाजीराव जगताप यांच्या पुढाकाराने छत्रपती सहकारी साखर कारखाना व नंतर डॉ. आर.जी. बजाज यांनी खासगी साखर कारखाना उभारून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. माजलगाव तालुक्याच्या ऊस लागवडीवर तीन कारखाने अतिशय उत्तमरीत्या चालत असून, आजूबाजूच्या तालुक्यातील कारखानेदेखील या भागातील ऊस घेऊन जात आहेत. मागील दोन वर्षात माजलगाव तालुका व परिसरात चांगला पाऊस पडल्याने या भागात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली होती. यामुळे मागील सहा महिन्यापासून तीन कारखाने जोमाने उसाचे गाळप करत असून, आणखीन एक महिना गाळपासाठी लागेल एवढा ऊस शिल्लक आहे.
१८ एप्रिलपर्यंतची स्थिती
कारखाना गाळप (मे. टन) साखर उत्पादन (क्विंटल)
कै. सुंदरराव सोळंके सह. साखर कारखाना, ७ लाख ९४ हजार २०० ६ लाख २७ हजार ७७०
छत्रपती सहकारी साखर कारखाना ३ लाख ५७ हजार ७२० ३ लाख ५० हजार ८४५ क्विंटल
जय महेश शुगर्स ९ लाख १५ हजार १५४ ९ लाख १८ हजार ४०० क्विंटल
--------------
या तीन कारखान्यांनी २० लाख ६६ हजार ९७४ गाळप करत १८ लाख ९७ हजार १५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. माजलगाव तालुक्यातील तीन कारखाने आतापर्यंत २१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. हे कारखाने आणखी महिनाभर चालतील व तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करतील, असा अंदाज या कारखान्यांकडून वर्तविला जात आहे. मराठवाड्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत माजलगाव तालुका गाळपात अग्रेसर राहिला आहे.
१५ मेपर्यंत चालणार गाळप
माजलगाव तालुका व कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. त्यामुळे कारखाने १५ मेपर्यंत चालतील, असा अंदाज आहे. यामुळे एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही.
- मोहन जगताप, उपाध्यक्ष, छत्रपती सहकारी साखर कारखाना
===Photopath===
190421\purusttam karva_img-20210310-wa0041_14.jpg