बीड जिल्ह्यात शिक्षकांच्या तीन संवर्गातील ११ जणांना दिल्या पदोन्नत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:55 AM2018-08-21T00:55:28+5:302018-08-21T00:55:55+5:30
बीड येथील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या तीन संवर्गातील ११ पदोन्नत्या सोमवारी समुपदेशनाने पार पडल्या.
बीड : येथील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या तीन संवर्गातील ११ पदोन्नत्या सोमवारी समुपदेशनाने पार पडल्या. सेवा ज्येष्ठता सूचीनुसार मुख्याध्यापक (अराजपत्रित) पदासाठी १० , शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-२ साठी १५ तर शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी- ३ साठी ३५ जणांना बोलावले होते. या तीन संवर्गातून रिक्त ११ पदांवर अंतिम निवड करावयाची होती.
सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धन्वंतकुमार माळी, मुख्य वित्त व लेखाधिकारी सुरेश केंद्रे, शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्याध्यापक पदासाठी शाळा कोणती उपलब्ध आहे, याची माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले. तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांसाठी कोणता तालुका उपलब्ध याबाबत समुपदेशन करण्यात आले.
त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार खुल्या संवर्गातील ७ कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, ३ ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि १ अराजपत्रित मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यात आली.
उपलब्ध जागांची माहिती देऊन समुदेशन करण्यात आले. सुरळीत व सुलभपणे ही प्रक्रिया पार पडल्याचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी सांगितले.
आधीच्या गैरप्रकारामुळे ज्येष्ठांवर अन्याय
शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया जरी पार पडली असलीतरी जवळपास १२ जण तोतया कारभारी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे श्रेणी ३ मधील पाच शिक्षकांना पदोन्नतीपासून वंचित रहावे लागले आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांच्या कार्यकाळात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले होते. विशेष म्हणजे हे शिक्षक सर्व शिक्षा अभियानासाठी घेण्यात आले होते. सेवा ज्येष्ठता सूची तसेच पदोन्नती समिती नसताना पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. दरम्यान ही बाब नियमबाह्य असल्याचे लक्षात येताच हे आदेश आपण दिलेले नाहीत व तसे असेल तर परत घेतो असे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे सर्व शिक्षासाठी नियुक्त संबंधित शिक्षकांना परत शाळेवर पाठविण्याबाबत शासन निर्णय असताना शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाले. याच कालावधीत इतर काही शिक्षकांना विस्तार अधिकारी तर काहींना ज्येष्ठता यादीत नसताना प्राथमिक पदवीधर म्हणून नियमबाह्य पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. शिक्षण विभागातून आदेश प्राप्त करत हे १२ शिक्षक नियमबाह्यपणे अद्यापही काम करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांनी असे आदेश कसे व कोठून मिळाले, याचा शोध घेण्याची गरज आहे. नियमबाह्यपणे शासनाचे लाभ त्यांनी उचलल्याची माहिती पुढे येत असून चौकशीची गरज असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे.
यांच्याकडील आदेशाबाबत संशय
५ मुख्याध्यापक : धारूर तालुक्यातील गावंदरा येथील आश्रुबा तिडके, चाटगाव येथील अर्जुन मुंडे, धारूर कन्या शाळेतील गंगाधर शिंदे, चारदरी येथील दत्ता घोळवे आणि घागरवाडा येथील रामहरी गांधले
४ केंद्रप्रमुख : आसरडोह येथील व्यंकट गडदे, राधाकृष्ण कांबळे, सय्यद हकीम, कोकणे
३ प्राथमिक पदवीधर : गेवराई तालुक्यातील रामपुरी केंद्रातील चोपड्याची वाडी येथील रघुनाथ मचले, याच तालुक्यातील रेवकी केंद्रांतर्गत हिंगणगावचे एस. बी. बिरकले तसेच प्रा. शाळा महार टाकळी घटक शाळा उमापूर केंद्रातील विजय देठे.
जिल्हा परिषद प्रशासन या १२ जणांच्या आदेश व कागदपत्रांची तपासणी करणार काय? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.