‘स्वराती’च्या ९ सहयोगी प्राध्यापकांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:00+5:302021-05-17T04:32:00+5:30
अंबाजोगाई : स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ९ सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे आदेश राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण ...
अंबाजोगाई :
स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ९ सहयोगी प्राध्यापकांच्या पदोन्नतीचे आदेश राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने काढले आहेत. त्यांना प्राध्यापक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. टी. पी. लहाने यांनी नुकतेच आदेश काढले आहेत.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या कार्यालयीन आदेशान्वये स्वाराती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विषयातील सहयोगी प्राध्यापकांना ‘प्राध्यापक’ या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात (३६० दिवस) तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.
शासन आदेश तसेच वेळोवेळी तद्नंतर शासनाने निर्गमित केलेल्या तदर्थ पदोन्नतीच्या आदेशास अनुसरून सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ३६० दिवसांकरिता तदर्थ पदोन्नती देण्यात आलेल्या होत्या. त्यास अनुसरून राष्ट्रीय वैद्यक आयोगाच्या प्रमाणकानुसार विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यासाठी अध्यापकांना तात्पुरत्या स्वरुपात ३६० दिवसांकरिता तदर्थ पदोन्नती देण्याकरिता संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. कोरोनाने २०१९-२०२० पासून जे प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक तात्पुरत्या पदोन्नतीने कार्यरत होते. अशा सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक पदोन्नती दिली आहे. एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ देण्यात येत आहे.
...
३६० दिवसांकरिता पदोन्नती
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई येथे कार्यरत असलेल्या डॉ. संभाजी चाटे, सहयोगी प्राध्यापक, बालरोग चिकित्साशास्त्र, डॉ. मनोज डोंगरे, सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र, डॉ. नितीन चाटे, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, डॉ. एस. व्ही. बिराजदार, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र डॉ. प्रशांत हिप्परगेकर, सहयोगी प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र डॉ. सुनीता हंडरगुळे, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रीयाशास्त्र, डॉ. शिवाजी बिरारे, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र, डॉ. संदीप निळेकर, सहयोगी प्राध्यापक सूक्ष्म जीवशास्त्र, डॉ. राजेश अंकुशे, सहयोगी प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र या ९ सहयोगी प्राध्यापकांना प्राध्यापक या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात ३६० दिवसांकरिता तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.
सदरील आदेशावर संचालक डॉ. टी.पी. लहाने यांची स्वाक्षरी आहे.