रानमेव्याची समृद्धी ! लॉकडाऊनने झाली कमाल, शेतात आढळल्या मोहळाच्या आठ पोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:45 PM2021-02-08T15:45:39+5:302021-02-08T15:47:08+5:30
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतातील प्रकार
- नितीन कांबळे
कडा (बीड ) - आजवर एक पोळी असलेली मोहळ झाडावर किंवा कुठे तरी उंचीवर आपण पाहिले असेल, पण आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांच्या शेतात रविवारी मधाच्या तब्बल आठ पोळ्या एकाच ठिकाणी आढळून आल्या आहेत. शेतातील एका माठात हे मधाचे पोळे आढळून आल्याने लॉकडाऊनमुळे सकारात्मक परिणाम होऊन रानमेव्याची गोडी आठ पटीने वाढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महादेव सर्जेराव घुले यांचे गावापासून जवळच शेत आहे. शेतात जनावरं व शेळ्यासाठी घास केला आहे. याच कांद्याच्या शेतात एक मातीचा माठ ठेवलेला होता. काही कारणास्तव हा माठ त्यांनी बाजूला करण्याचा पर्यंत केला. यावेळी आजवर कधीच दिसले नाही असे दृश्य त्यांना दिसले. माठात मधमाश्यांनी तब्बल आठ पोळ्या तयार केल्याचे आढळून आले. तो माठ त्यांनी उचलुन तसाच गावात आणला. मधाच्या एकाचवेळी आठ पोळ्या ग्रामस्थांसाठी आश्चर्यचा विषय ठरत आहे. असे दृश्य पहिल्यांदाच बघत असल्याचे उपसरपंच विजय डुकरे यांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात ठेवला होता माठ
लाॅकडाऊन काळात शेतात पाणी पिण्यासाठी माठ ठेवला होता. नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. आता कांदे काढताना तो माठ पाहिला तर त्यात मधाच्या पोळ्या आढळून आल्या. मोहळ धुर करून उठवले. त्यात आठ पोळ्याचे मोहळ होते. त्यातून तब्बल साडेतीन किलो मध मिळाला असल्याची माहिती शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांनी सांगितली.