‘समृद्ध गाव, समृद्ध संवाद’ स्पर्धा; जिल्हाधिकाऱ्यांनी साधला गावांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:18+5:302021-01-03T04:33:18+5:30
आष्टी : पाणी फाऊंडेशनने ‘समृद्ध गाव, समृद्ध संवाद’ स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात आष्टी ...
आष्टी : पाणी फाऊंडेशनने ‘समृद्ध गाव, समृद्ध संवाद’ स्पर्धा आयोजित केली आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी यासंदर्भात आष्टी तालुक्यातील आठ गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी या गावांचे सरपंच, उपसरपंच, जलमित्र, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक उपस्थित होते.
संतोष शिनगारे यांनी सुरुवातीला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘वॉटर कप ते समृद्ध गाव’ स्पर्धेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकारी रेखावार यांनी उपस्थित ग्रामस्थांचा परिचय करून घेतानाच त्यांच्या गावातील समस्या जाणून घेतल्या व आतापर्यंत गावात झालेल्या कामांबद्दलची माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी रेखावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नरेगा कृती आराखडा व काही कामे वाढवून पुरवणी कृती आराखडा तयार करण्यास सांगितले. तसेच वॉटर बजेटमधील तूट भरून काढण्यासंदर्भात, ई-पीक पाहणी पद्धतीबदल सविस्तर माहिती दिली व त्यानुसार आपल्या गावातील शेतात जाऊन सर्वांनी आपले पिके त्या अप्लिकेशनमध्ये नोंदवावी, असे आवाहन केले.
गावातील राहिलेली जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यास सांगितले. तलावातील गाळ काढण्यासाठी, ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी, बांधबंदिस्ती करण्यासाठी प्रशासनाकडून जेसीबी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताना ग्रामस्थांनी केवळ डिझेलची व्यवस्था करावी, असे सांगितले.
याच अनुषंगाने अर्ज प्रस्ताव नरेगा विभागात द्यावेत. सराटेवडगाव येथे ५ हजार रोपांची लागवड केेली असून, सालेगावने १४ हजार रोपे लावून त्याची चांगली निगा राखल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले. शेरी ग्रामपंचायतीने श्रमदानातून गावातील गट-तट नष्ट केले व मनसंधारणातून जलसंधारण व जलसंधारणाच्या माथ्यावरच्या उपसचराबरोबरच गावातील लोकांच्या मनावर व माथ्यावर उपचार करून शेरी बु. गाव बिनविरोध केल्याबद्दल जिल्ह्यधिकाऱ्यांनी शेरी बु. गावाचे अभिनंदन केले.
अनेक गावातील टँकर बंद झाले असून, फळबागांचे क्षेत्रही वाढल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. पोखरा योजनेतून लवकरात लवकर सर्व लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवावेत, अशाही सूचना जिल्ह्यधिकाऱ्यांनी केल्या. प्रत्येक पिकनिहाय फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करण्याचा सल्लाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे, तालुका समन्वयक कैलास पन्हाळकर व झुंबर पिंपळकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. नवीन वर्षात पदार्पण करताना एक सकारात्मक शक्ती, ऊर्जा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही घेत आल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली व याची फलश्रुती आपल्याला लवकरच आम्ही कामातून दाखवून देऊ, असे सांगितले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत चांगले काम केले. गाव पाणीदार झाल्यानंतर जेवढा आनंद आम्हाला झाला, तेवढाच आनंद आज तीन तास जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनातून झाला, असे मत जलमित्रांनी व्यक्त केले.