देहाचे रक्षण जनकल्याणासाठी करा- शंकराचार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:56 PM2019-02-04T23:56:44+5:302019-02-04T23:57:08+5:30
जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.
बीड : प्रत्येक मनुष्य जगण्यासाठी शिक्षण घेतो, नौकरी करतो, पैसा कमावतो आणि उदरनिर्वाह करीत सुख उपभोगतो. हे सर्व करण्यासाठी देह हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्या देहाचे रक्षण आपण करतो. पण हे पुरेसे आहे आहे का? असा प्रश्न उपस्थित करत केवळ सुख उपभोगण्यासाठी देहाचे रक्षण पुरेसे नाहीतर जनकल्याणाचे तत्व आणि धर्म कार्य करण्यासाठी या देहाचे रक्षण करा तरच आनंद, सुख व समाधान प्राप्त होईल, असा उपदेश दक्षिणाम्नाय शारदापीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरू शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी यांनी बीड येथे रविवारी गुरुवंदना कार्यक्रमप्रसंगी दिला.
यावेळी श्रीविधुशेखर भारती स्वामीजी म्हणाले, मानवाचे शरीर हे उसासारखे आहे. साखरेची मधूर चव आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी उसाला चरकातून जावं लागतं, रस काढावा लागतो त्यासाठी त्याला अनंत कष्ट भोगावे लागतात तेव्हा आपल्या साखरेची मधूर चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे शरीराला देखील कष्ट देऊन धर्मकार्य, पुण्यकर्म करण्याचे अनुष्ठान करण्यासाठी आपली शक्ती आणि सामर्थ्य असले पाहिजे, असे ते म्हणाले. वय झाल्यानंतर नव्हेतर शरीर स्वस्थ असताना धर्मसाधना करा, चांगले तत्व, विचाराने ज्ञान प्राप्त करा तरच आपले अज्ञान दूर होईल. देहाची शक्ती कमी झाल्यावर धर्मकार्य करून काही उपयोग होणार, नाही असा संदेश त्यांनी युवा पिढीला दिला. हे माझे, ते माझे असे मनुष्य म्हणत असतो पण हे सत्य नसून शाश्वत केवळ परमात्मा असल्याचे ते म्हणाले.
प्रारंभ संयोजन समितीचे अॅड. कालिदास थिगळे, वे.शा.सं.धुंडीराज शास्त्री पाटांगणकर, ह.भ.प.भरतबुवा रामदासी, वे.शा.सं. अमोलशास्त्री जोशी, डॉ. दिलीपराव देशमुख, सतीश पत्की, दिलीप खिस्ती, दुर्गादास गुरुजोशी, एकनाथ महाराज पुजारी, प्रमोद पुसरेकर, संजय गुळजकर, विनायक पटांगणकर, वाय. जनार्दन राव यांच्या हस्ते स्वामीजींचे स्वागत ऋणपत्र देऊन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी अनिल कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, अक्षय भालेराव, विष्णुदास बियाणी, सचिन कुलकर्णी, दीपक सर्वज्ञ, बाळासाहेब रुईकर, उदय जोशी, अलोक कुलकर्णी, प्रशांत आंबेकर, प्रसाद राजेंद्र, सौरभ जोशी, ओंकार पाठक, रोहित कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व वेद मंत्रपठण अनंतशास्त्री मुळे, सूर्यकांत मुळे, गोविंद महाराज जाटदेवलेकर, दुर्गादास जोशी यांनी केले तर आभार दिलीप खिस्ती यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्येने नागरिक सहभागी झाले होते.