मानवी साखळीतून शिक्षणाच्या बाजारीकरणाचा केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 12:33 AM2018-10-22T00:33:07+5:302018-10-22T00:33:24+5:30
बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली.
या मानवी साखळीच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यासाठी शहरातील विद्यार्थी, युवक, महिला, नागरिकांनी, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यावेळी विविध मागण्यांचे फलक आंदोलकांनी हातात उंचावले होते तसेच क्रांतिकारी गीते सादर करून विद्यार्थी व युवकांनी आपल्या समस्या मांडल्या. दिवसेंदिवस रोजगार व शिक्षणविषयक समस्या जटील बनत चालल्या आहेत.
गेल्या काही वर्षात देशातील व राज्यातील शिक्षण रोजगार विषयक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे.
या आहेत मागण्या
बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करा. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना खाजगी शाळेत असलेल्या २५ % राखीव प्रवेश आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करा, या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, एससी, एसटीचा नोकरीतील अनुशेष त्वरित भरून काढा, व्यावसायिक अभ्यासक्रमाची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा, मुलींना बारावीपर्यंत मोफत बस पास योजनेची सर्वत्र तात्काळ अंमलबजावणी करा. सरकारी सेवांमधील तीन लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा भराव्यात अशी मागणी सहभागी नागरिकांनी केली.