परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 07:33 PM2018-07-19T19:33:31+5:302018-07-19T19:33:55+5:30
आज मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.
परळी (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मेगा भरती रद्द व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने बुधवारी परळी तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले. आज मोर्चाच्या दुसऱ्या दिवशीही तहसील कार्यालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरूच होते.
बुधवारी मराठा क्रांती मोर्चाचा परळी तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा धडकल्याने व रात्रभर ठिय्या आंदोलन केल्याने राज्यभर याचे पडसाद उमटणे सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा बुधवारी विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोकरभरतीत 16 टक्के आरक्षण मराठा समाजाला असल्याचे घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतरही आंदोलक समाधानी झाले नाहीत. यामुळे सायंकाळी परळी तहसीलसमोर ठिय्या आंदोलन सुरूच होते. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास गुरूवारी बीड, अंबाजोगाई, परळी, परभणी येथील विविध पक्षाच्या नेत्यांनी भेट देवून पाठींबा जाहीर केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर आमचा विश्वास नाही असे मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत परळी तहसीलसमोर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन चालूच राहील असेही पाटील यांनी 'लोकमत' शी बोलतांना सांगितले.