आंदोलकांनी रेड्याला बांधले पाटोदा तहसील कार्यालयाच्या गेटवर; केली 'ही' मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 05:49 PM2018-08-16T17:49:41+5:302018-08-16T17:54:00+5:30
तालुक्यातील काही नागरिकांनी तहसीलमधून दिल्या जाणाऱ्या नमुना क्र. १४ च्या नकलाबाबत तक्रार नोंदवली आहे.
पाटोदा ( बीड ) : तालुक्यातील काही नागरिकांनी तहसीलमधून दिल्या जाणाऱ्या नमुना क्र. १४ च्या नकलाबाबत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार चुंबळी आणि डोमरी या गावातील काही ग्रामस्थांनी खोट्या नमुना क्र. १४ चा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र मिळवली आहेत. याची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
तालुक्यातील चुंबळी आणि डोमरी या गावातील काही ग्रामस्थांनी खोट्या नमुना क्र. १४ चा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र मिळवली आहेत. या आधारे ते राजकीय लाभ घेत आहेत, याची चौकशी करावी अशी मागणी २१ जून रोजी लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली होती. चौकशी समितीने यावर निष्कर्ष काढत प्रमाणपत्र तहसीलचे असल्याने ते खोटे आहेत असे म्हणता येणार नाही अशी टिपण्णी केली. यावर आक्षेप घेत आंदोलकांनी आज दुपारी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रेडा बांधला. आणि हा रेडा तहसीलचा आहे असे प्रमाणपत्र मिळावे अशी उपरोधिक मागणी केली. तहसीलदार रूपा चित्रक यांनी आंदोलकांशी चर्चा करून याप्रकरणी नव्याने चौकशीचे आश्वासन दिले.
आंदोलनात लोकजनशक्ती पार्टीचे गोरख झेंड, सुभाष सोनवणे, रमेश वारभुवन, विठ्ठल पवळ, बाबासाहेब उबाळे, बिभीषण गायकवाड, सुनील जावळे, दिगंबर उबाळे, शामराव मस्के, विठ्ठल नाईकवाडे आदींचा सहभाग होता.