माजलगावात आंदोलकांची पोलीसांवर दगडफेक; बँक, हॉटेल फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 07:12 PM2023-09-02T19:12:31+5:302023-09-02T19:12:59+5:30
आगारात थांबलेल्या बसवर देखील बाजार रोडवरून दगडफेक करण्यात आली
माजलगाव : जालना लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध करताना शहरात बंदच्या दरम्यान शिवाजी चौक , नवीन बसस्थानक समोर आंदोलक आक्रमक झाले. येथील पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली. उघडया असलेल्या पूर्णवादी बँक व संभाजी चौकातील एका हॉटेल दगडफेक करून फोडण्यात आले.
जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये अनेक जण जखमी झाले होते. याचा निषेध म्हणून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. माजलगाव शहरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंदोलकांनी शिवाजी चौक या ठिकाणी थांबलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. त्याचबरोबर नवीन बस स्थानकासमोर देखील दगडफेक केल्याचा प्रकार घडला यात कोणीही जखमी झाली नाही. त्याचबरोबर आगारात थांबलेल्या बसवर बाजार रोडवरून दगडफेक करून काचा फोडल्या.
त्याचबरोबर येथील पूर्णवादी बँक आपल्या दैनंदिन कामासाठी उघडण्यात आली असताना दगडफेक करण्यात आली. यात बँकेच्या एटीएम व बँकेच्या काचा फोडण्यात आल्या. त्याचबरोबर संभाजी चौक या ठिकाणी असलेल्या सुखसागर हॉटेलवर देखील आंदोलकांनी दगडफेक केली. यात हॉटेलमधील काचा फोडण्यात आल्या.