पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:33 AM2021-01-20T04:33:19+5:302021-01-20T04:33:19+5:30
अंबाजोगाई : केज मतदार संघातील काही गावात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर, हजारो कोंबड्यांचे कलिंग करून त्यांची विल्हेवाट ...
अंबाजोगाई : केज मतदार संघातील काही गावात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर, हजारो कोंबड्यांचे कलिंग करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. बर्ड फ्लूच्या भीतीमुळे कुक्कुटपालन व्यवसाय ठप्प झाला असून, व्यावसायिक प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे केज मतदार संघातील पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत देऊन अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी विनंती भाजपचे युवानेते अक्षय मुंदडा यांनी पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन केली.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोरोना संसर्गासाठी कोंबड्या जबाबदार असल्याची अफवा उठली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाला उतरती कळा लागली होती. या धक्क्यातून हा व्यवसाय सावरत असतानाच बर्ड फ्लू आला. केज विधानसभा मतदार संघातील लोखंडी सावरगाव येथे बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आल्यानंतर जवळपास दीड हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या, तसेच दहा किलोमीटर परिसरातील कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला. या परिसरातील ८० पोल्ट्री शेडमधील हजारो कोंबड्या विक्रीविना पडून आहेत. या पक्ष्यांच्या देखभालीसाठी प्रचंड खर्च येतो, परंतु विक्री ठप्प असल्याने पैसे नाहीत, अशा दुहेरी कात्रीत कुक्कुट व्यावसायिक सापडले आहेत. कुक्कुट व्यावसायिकांनी या प्रश्नावर एकत्र येत सोमवारी आ.नमिता मुंदडा यांची भेट घेतली होती. त्यानंतर, अक्षय मुंदडा यांनी मंगळवारी मुंबईत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना होत असलेल्या आर्थिक नुकसानीबद्दल चर्चा केली आणि त्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यावर मंत्री सुनील केदार यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन मुंदडा यांना दिले.