१० दिवसात शेतकऱ्यांना मदत द्या; अन्यथा एकही सरकारी कार्यालय चालू देणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 04:28 PM2019-11-06T16:28:40+5:302019-11-06T16:29:44+5:30
लोखंडी सावरगाव येथे "स्वाभिमानी" च्या चक्काजाम आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी दिला निर्वाणीचा इशारा
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात सतत १५ दिवस पडलेल्या बेमोसमी मुसळधार अतिवृष्टीने खरिप हंगामातील सोयाबीन, कापूस,तूर,उडीद, मूग,मका,हायब्रीड ज्वारी, बाजरी आदी सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लक्ष रु नुकसान भरपाई व सरसकट पीकविमा तात्काळ वाटप करण्याच्या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना केज,अंबाजोगाई तालुक्याच्या वतीने लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई येथे बुधवारी ( दि ६ ) सकाळी १० वाजता तब्बल २ तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळेबीड-लातुर-अंबाजोगाई-कळंब महामार्गावर दुतर्फा शेकडो वाहने अडकून पडली होती.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंदोलकांनी अभिवादन करून चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी माजी. आ. पृथ्वीराज साठे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडी च्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि.प्रवक्ते प्रकाश बोरगावकर, शेतकरी नेते जयजीत शिंदे, कमलाकर लांडे,वृक्षमित्र सुधाकर देशमुख, लोकजनशक्ती चे राजेश वाहूळे,अंजली पाटील,अंबाजोगाई ता. अध्यक्ष योगेश शेळके,लहू गायकवाड, महेश गंगणे ,प्रमोद पांचाळ,अनिल रांजनकर, परमेश्वर वीर,अभिजीत लोमटे, चंद्रकांत अंबाड,सुग्रीव करपे,भागवत पवार ,शशिकिरण ढगे, आदी संयुक्त पुरोगामी महाआघाडी चे केज,अंबाजोगाई तालुक्यातील मित्रपक्षाचे नेते,पदाधिकारी उपस्थित होते. वरिल नमूद सर्वच पदाधिकऱ्यांनी समायोचित भाषणे करत निष्क्रिय काळजीवाहू सरकारवर टीकास्त्र सोडले.
येत्या १० दिवसात नुकसान भरपाई द्या
सरकारने आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नये तात्काळ सरसकट नुकसान भरपाई म्हणून राष्ट्रीय आपत्ती मधून हेक्टरी एक लक्ष रु व सरसकट विना अट पीकविमा वाटप करावा अशी मागणी जोरदारपणे करण्यात आली.जर दहा दिवसात नुकसानभरपाई नाही नाही तर बीड जिल्ह्यात कोणतेही सरकारी कार्यालय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी चालू देणार नाहीत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. तसेच सर्व गावबंद करून जिल्ह्यात व्यापक बेमुदत जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी प्रशासनाला दिला.
आंदोलनाची दखल घेत अंबाजोगाई तहसीलदार रुईकर यांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तात्काळ पाठवपुरावा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात लोखंडी सावरगाव, आपेगाव, धानोरा, सोमनाथ बोरगाव,हिवरा, सनगाव,श्रीपतरायवाडी आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांचा सहभाग होता. अंबाजोगाई ग्रामीण चे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने चक्का जाम आंदोलन शांततेत झाले.