गारपीटग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या; प्रकाश सोळंके यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 06:15 PM2018-02-12T18:15:25+5:302018-02-12T18:19:18+5:30
माजलगांव तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली.
माजलगांव (बीड ) : तालुक्यातील अनेक गावांना रविवारी झालेल्या गारपिटीने तडाखा दिला. यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केली. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची मदत देण्याची मागणी केली.
काल झालेल्या गारपिटीने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातील मंगरूळ नंबर 2 येथे आज दुपारी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके, जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, बाजार समितीचे सभापती अशोक डक, जयदत्त नरवडे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण अबुज यांनी भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी रवींद्र बापमारे यांच्या गारपिटीने नुकसान झालेल्या पपईच्या बागेची पाहणी केली. गारपिटीने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाल्याने जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर त्यांनी काळेगाव, दुब्बाथडी या शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या शिवारातील हरभरा, ज्वारी, गहू, कापूस व पपई, अंबा, केळी, टरबूज, खरबूज आदी फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सरसकट पंचनामे करा
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून शेतक-यांना तत्काळ प्राथमिक मदत द्यावी, पुढील कारवाई लवकरात लवकर करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सोळंके यांनी यावेळी केली. यासोबतच मागील तीन वर्षांपासून शासन केवळ शेतक-यांवर घोषणांचा पाऊस पडत आहे. प्रत्यक्ष मात्र त्यांनी कसलीही मदत दिलेली नाही अशी टीका डक यांनी केली.