बालमृत्यू दर शून्य करण्यासाठी बीडमध्ये जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:30 AM2018-05-29T00:30:52+5:302018-05-29T00:30:52+5:30
बीड जिल्ह्यातील बालमृत्यू दर शून्य व्हावा यासाठी आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. सोमवारी याचे जिल्हा रुग्णालयात उद्घाटन झाले. १५ दिवस कार्यक्रम व विविध माध्यमातून यावर जनजागृती केली जाणार आहे.
बीड : जिल्ह्यातील बालमृत्यू दर शून्य व्हावा यासाठी आरोग्य विभागाकडून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे. सोमवारी याचे जिल्हा रुग्णालयात उद्घाटन झाले. १५ दिवस कार्यक्रम व विविध माध्यमातून यावर जनजागृती केली जाणार आहे.
राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे अंतर्गत अतिसार नियंत्रण पंधरवडा हा कार्यक्रम २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे जिल्हा रुग्णालयात सोमवारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पंधरवड्यास सुरुवात झाली. यावेळी मेट्रन विजया सांगळे, अमित भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक (ग्रामीण) डॉ. सतीश हरिदास यांनी कार्यक्रमास भेट देऊन मार्गदर्शन केले.
दरम्यान, या पंधरवड्यात अतिसारमध्ये घ्यावयाची काळजी, जनजागृती, ओआरएस, झिंक गोळ्या यांचा कसा वापर करायचा या संदर्भात सोमवारी प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात आली. तसेच पंधरवड्यात ओआरएसचे घरोघरी जाऊन वाटप केले जाणार आहे. तसेच अंगणवाड्यात जाऊन कुपोषित बालकांवर उपचारही केले जाणार आहेत. १५ दिवस राबविल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात आशा स्वयंसेविका, एएनएचएम, डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी हे सर्व सहभागी होणार आहेत. बालमृत्यू दर कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असे डॉ. पाटील म्हणाले.
नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा पुढाकार
बीडमध्ये घेतलेल्या कार्यक्रमात नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी पुढाकार घेतला. रुग्ण व नातेवाईकांना मार्गदर्शन करण्याबरोबरच प्रात्यक्षिके करुन दाखवली. विद्यार्थिनींच्या सहभागामुळे डॉ. थोरात, डॉ. पाटील, डॉ. हरीदास यांनी त्यांचे स्वागत केले. १५ दिवस या विद्यार्थिनी जनजागृती मोहिमेत सहभागी होणार आहेत.