चिखलातून जीप बाहेर काढल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:17+5:302021-09-18T04:36:17+5:30
गेवराई : तालुक्यातील चकलांबा - चोरपुरी रस्त्यावर चिखलात जीप फसल्याने उपचाराअभावी ४० वर्षीय आजारी महिलेचा गाडीतच मृत्यू ...
गेवराई : तालुक्यातील चकलांबा - चोरपुरी रस्त्यावर चिखलात जीप फसल्याने उपचाराअभावी ४० वर्षीय आजारी महिलेचा गाडीतच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, गुरुवारी तालुक्यातील धुमेगाव - हनुमान नगर या रस्त्यावर पुन्हा असाच प्रकार घडला. एका गरोदर महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात घेऊन जाणारी जीप चिखलात फसली. मात्र, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जीप वेळीच चिखलातून बाहेर काढल्याने अनर्थ टळला. यामुळे गेवराई तालुक्यातील खराब रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गेवराई तालुक्यातील हनुमान नगर ते धुमेगाव रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर पूर्णतः चिखल झाला असून, पायी चालणेदेखील जिकरीचे झाले आहे. गुरुवारी येथील एका गरोदर महिलेला प्रसुतीकळा येऊ लागल्याने त्रास जाणवू लागला. यामुळे जीप बोलावून कुटुंबातील सदस्य या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेतील खराब रस्त्यात ही जीप फसल्याने एकच धांदल उडाली. दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत धक्के मारत काही वेळेत जीप चिखलाच्या बाहेर काढली. त्यामुळे पुढील उपचार घेणे सुलभ झाले. तालुक्यात खराब रस्त्यांमुळे दळवळणासाठी ग्रामस्थांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असून, हा रस्ता तत्काळ करावा, अशी मागणी हनुमान नगर येथील ग्रामस्थांनी केली आहे.
170921\17bed_1_17092021_14.jpg