बीडमध्ये २ लाख ११ हजार बालकांना २३५७ बुथवरून मिळणार पल्स पोलिओ लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 05:59 PM2020-01-17T17:59:09+5:302020-01-17T18:00:28+5:30
या मोहीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिकारी नियूक्त केले आहेत.
बीड : पल्स पोलिओ मोहीम रविवारी (दि. १९ ) आहे. त्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी प्र.जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात २३५७ बुथवरून ५९९० कर्मचाऱ्यांमार्फत पल्स पोलिओ डोस देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख ११ हजार ८१७ बालके आहेत. त्यांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी दोन कर्मचारी असलेले १०९६ बुथ व ३ कर्मचारी असलेले १२६१ बुथ असे २३५७ बुथचे नियोजन करण्यात आलेले आहे. ५ हजार ९९० कर्मचारी या मोहिमेचे काम करणार आहेत. तसेच विटभट्टी, झोपडपट्टी, जिनिंग, खडी केंद्र, वाड्या, वस्त्या, तांडे आदी ठिकाणी मोबाईल टिम तयार केल्या आहेत. तसेच प्रभात फेरी, भोंगा, पोस्टर, बॅनर आदी माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे.
या मोहीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर अधिकारी नियूक्त केले आहेत. तसेच लसीचे वितरणही करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी सांगितले. बैठकीला महिला व बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकाण, डॉ.जितेंद्र चव्हाण, डॉ.एल.आर.तांदळे, डॉ.सचिन शेकडे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.