पितृपंधरवड्यात भोपळा खातोय भाव; मंडईत ५०, तर घराजवळ ७० रुपये किलो !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:40+5:302021-09-27T04:36:40+5:30
का वाढले भाव ? ऑगस्टचे शेवटचे दोन दिवस आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह भाजी पिकांचे मोठे ...
का वाढले भाव ?
ऑगस्टचे शेवटचे दोन दिवस आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील पावसामुळे खरीप हंगामातील पिकांसह भाजी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतांमध्ये पाणी आणि चिखल साचल्याने तोडणी करण्यास अडचणी येत आहेत. परिणामी ऐन पितृ पंधरवड्यात भाजी बाजारात भाज्यांची आवक मागील काही दिवसांपासून घटली आहे.
गौरी गणपती काळात पावसाची उघडीप होती. त्यामुळे बाजारात भाज्यांची चांगली आवक राहिली. परंतु पितृपंधरवडा सुरू झाल्यापासून पावसाची रिपरिप सुरूच आहे.
भाव (प्रतिकिलो)
भाजीपाला मंडईतील दर घराजवळ
डांगर भोपळा २० ४०
गवार १०० १२०
कारली ६० ८०
वांगी ४० ६०
बीन् ६० ८०
टोमॅटो ४० ६०
बटाटे २० ३०
फ्लॉवर ४० ६०
सिमला ४० ६०
भेंडी ४० ६०
हिरवी मिरची ६० ८०
कोथिंबीर (एक जुडी) ०५ ०७
३) व्यापारी काय म्हणतात?
गणेशोत्सवाच्या आधीपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठोक बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. सणावारामुळे मागणी असल्याने भाज्यांचे दर तेजीत आहेत. सध्या पितृ पंधरवड्यात मागणी आणखी वाढली आहे. गवार, भोपळ्याचे भाव वाढते आहेत. -- हमीद बागवान, भाजी विक्रेता, बीड.
फिरते विक्रेते शहरात फिरून हातगाड्यांवरून भाजी विकतात. आडत बाजारातून भाजी प्रमाणात खरेदी करतात, त्यामुळे थोडे जादा पैसे मोजावे लागतात. हातगाड्याचे भाडे, सोबतच्या माणसाचा रोजगार अन स्वत:ची आमदनी पाहता ग्राहकांना भाव जास्त वाटतात. परंतु घरपोच भाजी मिळते, याचे समाधान असते. --- अशोक काळे, भाजी विक्रेता, बीड.
४) अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?
आम्ही उत्तम नगर भागात राहतो. भाज्यांसाठी रोज दोन किलोमीटर जाणे परवडत नाही. पेट्रोल शंभर रुपयांच्या पुढे गेल्याने वाहन न्यायचे नको वाटते. घराजवळच हातगाड्यांवर ताजी भाजी मिळते. मंडईतल्या दरापेक्षा महाग वाटते. पण, घ्यायची किती असते? अर्धा - एक किलोसाठी कोण जात बसले? -- शालिनी जोशी, गृहिणी, बीड.
आम्ही आदित्य नगरात राहतो. भाजी खरेदीसाठी राजीव गांधी चौक किंवा मंडईत लांब जावे लागते. एक तर रिक्षा मिळत नाही. मिळाली तर जाण्या येण्याचे ७०-८० रुपये भाडे मोजावे लागते. थोड्याशा भाजीसाठी हे परवडत नाही. त्या तुलनेत घराजवळ आलेल्या हातगाड्यांवर भाजी खरेदी करणे परवडते. - लता वारभुवन, गृहिणी, बीड.