पाटोद्यात बाधित पिकांचे पंचनामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:04+5:302021-09-13T04:32:04+5:30
अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या ...
अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे संयुक्तिक पंचनामे करावेत आणि तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या त्रिसदस्यीय समितीने तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्रासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व लागणारी आर्थिक मदत याबाबत अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने महसूल प्रशासनास दिले आहेत. पाटोदा तालुक्यात ३० व ३१ ऑगस्ट आणि ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून उभ्या पिकांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले. मूग, उडदाच्या शेंगांना पुन्हा कोंब फुटले, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उभे असलेले तूर, उसाचे पीक शेतातच आडवे झाले. डाळिंब गळून पडले. त्यामुळे बाधित पिकांचे पंचनामे सुरू आहेत.