पुणे-अमरावती एक्स्प्रेस पुन्हा सुरु झाल्याने प्रवाशांची झाली सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 07:04 PM2022-12-17T19:04:12+5:302022-12-17T19:06:21+5:30
गेल्या 33 महिन्यापासून बंद असलेली पुणे -अमरावती, अमरावती- पुणे एक्स्प्रेस रेल्वे गाडी पूर्ववत
- संजय खाकरे
परळी (बीड): पुणे-अमरावती एक्सप्रेस रेल्वे गाडी चे शनिवारी सकाळी आठ वाजता परळी रेल्वे स्टेशनमध्ये आगमन झाले. ही रेल्वे गाडी पूर्वीप्रमाणे परळी मार्गे अमरावतीकडे धावली. या रेल्वेगाडीमुळे पुण्याहून परळीला येणाऱ्या प्रवाशांची सोय झाली. तसेच अमरावतीहून परळीमार्गे परत पुण्याला जाणाऱ्या अमरावती -पुणे या रेल्वे गाडीमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे 22 मार्च 2020 पासून पुणे- अमरावती व अमरावती -पुणे एक्सप्रेस गाडी तब्बल 33 महिने बंद होती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. नांदेड- पनवेल ही पुण्याला परळी मार्गे धावणारी रेल्वेगाडी नेहमी फुल्ल असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय व्हायची. आता ही गैरसोय दूर झाली आहे. आठवड्यातून दोन दिवस पुणे -अमरावती आणि अमरावती- पुणे रेल्वेगाडी सुरु झाली आहे. या निर्णयाचे परळी रेल्वे संघर्ष समितीच्यावतीने चंदुलाल बियाणी, प्रा सत्यनारायण दुबे, अश्विन मोगरकर यांनी स्वागत केले आहे.
नवीन वेळापत्रक असे असेल
दर शुक्रवारी व रविवारी ही रेल्वे पुणे येथून रात्री १०.५० वाजता सुटेल व कुर्डवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर रोडमार्गे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवर सकाळी ८ वाजता येईल. त्यानंतर आठ वाजून पंधरा मिनिटाला परळीहून प्रत्येक शनिवारी व सोमवारी ही गाडी अमरावतीकडे धावेल. परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम ,अकोला मार्गे अमरावतीला जाईल. तसेच अमरावती- पुणे ही रेल्वे गाडी प्रत्येक शनिवारी व सोमवारी सुटेल व परळी येथे रविवारी व मंगळवारी सकाळी 5.30 वाजता येईल. ही रेल्वे लातूर रोड मार्गे पुण्याकडे जाईल व रात्री पुणे येथे पोहचेल.
कोविड काळात बंद असलेल्या सर्व गाड्या परळी मार्गे पूर्वीप्रमाणे धावत आहेत. परळी -मिरज ही गाडी काही महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. आता अमरावती- पुणे, पुणे -अमरावती रेल्वे गाडी आठवड्यातील २ दिवस पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आली आहे.
- संतोष चिगळे, रेल्वे वाणिज्य अधिकारी परळी
रेल्वे प्रशासनाने पूर्वी प्रमाणे गाड्या सुरु करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या गाडीत वातानुकूलित, स्लीपर कोच व जनरल कोच असेल.
- सत्यनारायण दुबे, परळी रेल्वे संघर्ष समिती
ट्रॅव्हल्सचे वाढलेले भाडे, एसटीच्या खडतर प्रवासापेक्षा पुण्याला जाण्यासाठी रेल्वेचा आरामदायक व स्वस्त प्रवास यामुळे होईल.
- आश्विन मोगरकर, रेल्वे प्रवाशी परळी