माजलगावमध्ये ४२ कोटींची कापूस खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:46 AM2019-12-16T00:46:25+5:302019-12-16T00:46:45+5:30
माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सात खाजगी तर सहा शासकीय अशा एकूण १३ केंद्रांवर ८८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत ४२ कोटी रुपयांच्या घरात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सात खाजगी तर सहा शासकीय अशा एकूण १३ केंद्रांवर ८८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून याची किंमत ४२ कोटी रुपयांच्या घरात आहे. दरम्यान, शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विक्र ीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत खाजगी केंद्रावर १० आॅक्टोबरपासून कापूस खरेदी सुरू झाली. सुरुवातीला शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू नसल्याने कापसाला प्रतिक्विंटल ५२०० ते ५५०० रूपये इतकाच दर मिळत होता. २८ नोव्हेंबरपासून शासकीय केंद्रावर खरेदी सुरू झाल्याने कापसाच्या भावात वाढ झालेली आहे. खाजगी कापूस खरेदी केंद्रावर आता प्रति क्विंटल ४७०० ते पाच हजार रूपये इतका भाव मिळत आहे. या तुलनेत शासकीय कापूस खरेदी केंद्रावर पाच हजारांपेक्षा अधिकचा भाव मिळत आहे. परंतु शेतकऱ्याला सातबारा, बॅँक खातेपुस्तकाची सत्यप्रत, आधार कार्ड आदी कागदपत्रांची पूर्तता करावी लागत आहे. विकलेल्या कापसाची रक्कमही आठ ते दहा दिवसांनी मिळते. गरजेनुसार रोखीसाठी शेतकरी खाजगी कापूस खरेदी केंद्राकडे जात आहेत.
गैरसोय टळली
सुरुवातील एकच शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. ती टाळण्यासाठी आता सहा ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.
खरेदी केंद्रावर शेतक-यांना वजन काटा किंवा भावामध्ये तफावत आढळल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.